मंडलिक गटातही धुसफूस, घाटगेही ताकद अजमावणार
अनिल पाटील
मुरगूड : गेल्या पाच वर्षांतील बदललेल्या राजकीय समीकरणामुळे येऊ घातलेली मुरगूड नगर परिषदेची निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. पालिकेवर सर्वाधिक काळ सत्ता गाजवणाऱ्या पाटील गटामध्ये उभी फूट पडल्यानंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे. मंडलिक गटातही अंतर्गत धुसफूस आहेच; पण या गटात नेत्यांचा शब्द अंतिम मानला जातो. समरजित घाटगे गटानेही लढण्याची सावध तयारी सुरू केली आहे. कोण कोणाबरोबर राहणार यावरच विजयाचा लंबक अवलंबून असणार आहे. सध्या तरी मंडलिक गट एकसंघ निवडणुकीला समोरे जातो का? दोन्ही पाटील बंधू एकत्र येतील का? घाटगे गटाची युती कोणाबरोबर होणार? या सगळ्या विषयांवर चर्चा होताना दिसते.
सध्या पालिकेमध्ये मंडलिक गटाची म्हणजे शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. बहुमत असूनसुद्धा बराच काळ नगरसेवकांमध्ये धुसफूस सुरू राहिल्याने विकासकामांमध्ये अडथळे निर्माण झाले; पण सध्या मात्र विविध कामांची रेलचेल सुरू आहे. यामध्ये नगरपालिकेसमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसवण्याचे काम प्रस्तावित आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मंडलिक गटाने एकाकी लढत देऊन चौदा जागांवर विजय मिळवला होता, तर गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील व बिद्री संचालक प्रवीणसिंह पाटील यांनी मुश्रीफ गटाबरोबर युती करून निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता, तर ऐनवेळी मंडलिक गटाबरोबर युतीची चर्चा फिस्कटल्याने घाटगे गटाने सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. वातावरण चांगले असतानाही पाटील मुश्रीफ आघाडीला पराभव पत्करावा लागला.
या निवडणुकीनंतर पाटील गटामध्ये उभी फूट पडली आहे. रणजितसिंह पाटील व प्रवीणसिंह पाटील भाजप आणि राष्ट्रवादीत दाखल झाले. या दोन्ही गटांचे कार्यकर्ते अजूनही दोन्ही बंधू एकत्र यावेत, असे मत व्यक्त करत आहेत; पण हे दोघे एकमेकांकडे पाहण्यास तयार नसल्याने पालिका निवडणुकीत ते एकमेकांच्या विरोधात उभे राहणार, असे चित्र दिसते. याचा फायदा मंडलिक गटाला होणार आहे; परंतु मंडलिक गटाच्या नगरसेकांत वाद आहे. याचे पर्यवसान हाणामारीपर्यंत गेले. यातून फूट पडली तर वेगवेगळ्या आघाड्या पाहायला मिळतील. सध्या रणजितसिंह पाटील आणि समरजित घाटगे गट एकत्रित या निवडणुकीला सामोरे जातील, असे चित्र आहे.
प्रभागरचनेनंतर खऱ्या अर्थाने मोर्चेबांधणीला वेग येणार आहे.
..................
पक्षीय बलाबल
शिवसेना (मंडलिक गट ) 14,
राष्ट्रवादी (मुश्रीफ पाटील गट ) 3,
लोकसंख्या 11194,
मतदार 9455
झालेली कामे
24 तास नळ पाणीपुरवठा,
तुकाराम चौक सुशोभीकरण, हाय मॅक्स दिवे,
रस्त्याची कामे, सूर
शॉपिंग कॉम्प्लेक्स
.......
प्रभाग सतरा
सर्व साधारण 9,
नागरिकांचा मागास प्रवर्ग 6,
अनुसूचित जाती 2