कोल्हापूर : माणदेशी महिला अशिक्षित असल्या, तरी त्या व्यवहारज्ञानात पुढे आहेत. त्या बळावरच त्यांनी रिझर्व्ह बॅँकेकडून माणदेशी बॅँकेला परवाना मिळविला. पाचवीला पुजलेल्या दारिद्र्य, अडचणी, संघर्ष व कष्टाला त्या आनंदाने सामोरे गेल्या; त्यामुळे माणदेशी परिसर जरी सधन नसला, तरी येथील महिला या खऱ्या अर्थाने मालकीन म्हणजे कारभारणी आहेत, असे गौरवोद्गार माण (जि. सातारा) येथील समाजसेविका चेतना सिन्हा यांनी काढले.मराठा महासंघातर्फे आयोजित राजर्षी शाहू मराठा महोत्सवात शाहू स्मारक भवन येथे ‘महिला सबलीकरण’ या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, महिला जिल्हाध्यक्ष शैलजा भोसले, बीना देशमुख, दीपा ढोणे, सुनीता घाटगे, छाया पवार, तेजस्विनी नलवडे, वंदना भोसले, महापालिका अधिकारी निवास कोळी, आदींची होती.चेतना सिन्हा म्हणाल्या, माणदेशी बॅँकेची संकल्पना सुचन्यामागे तेथील अशिक्षित व गरीब महिलांची धडपड कारणीभूत आहे. जिद्द, विनयशिलता व प्रामाणिकपणा या गोष्टींच्या बळावर या महिलांनी रिझर्व्ह बॅँकेलाही माणदेशी बॅँकेचा परवाना देणे भाग पडले. तो देताना अधिकाऱ्यांनी अशिक्षित महिलांना परवाना द्यायचा कसा? त्या कशा पद्धतीने कारभार करू शकतील. त्यावर या महिलांनी आमच्या काळात गावांमध्ये शाळाच नसल्याने आम्ही शिकू शकलो नाही; त्यामुळे आम्हाला लिहिता, वाचता येत नसले, तरी पैसे मोजता येतात, बॅँकेचे व्याजही मोजू शकतो या समर्पक व विचार करायला लावणाऱ्या उत्तराने अधिकारीही अवाक् झाले.
घिसाडी, मेंढपाळ, रोजगारावर जाणाऱ्या महिलांनी एकत्र येऊन ही बॅँक निर्माण केली. स्वत:च्या मिळकतीतील पै अन् पै बचत करून सर्वांसमोर एक उदाहरण घालून दिले. त्यांच्या दूरदृष्टीच्या विचाराने येथील मुले शिक्षण, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत सातासमुद्रापार गेली आहेत. कष्ट आणि संघर्षातही आनंद मानून त्याला हसतच सामोरे जाणाºया या महिलांचा खरोखरच अभिमान वाटतो.त्या पुढे म्हणाल्या, आयुष्य हे एकदा मिळते, त्यामुळे ते मौल्यवान असून, स्वच्छंदी व मुक्तपणे जगून त्याचा आनंद घ्या. महिलांनी शिकून इतरांनाही शिकण्यास प्रेरणा द्यायला हवी.
भूक विसरण्यासाठी गातो गाणीमाणदेशी बॅँकेनंतर महिलांनी स्वत:चे रेडिओ स्टेशन सुरू केले आहे. यामध्ये केराबाई सरगर या महिला स्वत: गाणी म्हणतात. त्याला श्रोतेही भरभरून दाद देतात. इतकी सुंदर गाणी कसे गाता? हा प्रश्न त्यांना विचारल्यावर वयाच्या ११ व्या वर्षी माझे लग्न झाले, गरोदर राहिल्यावर वारंवार लागणारी भूक विसरण्यासाठी मी गाणी म्हणायला लागले, असे सांगितले. यावरून ग्रामीण भागातील महिलांचे टॅलेंट दिसून येते, असे चेतना सिन्हा यांनी सांगितले. हा प्रसंग प्रत्येक महिलेसह माणसालाही अंतर्मुख व्हायला लावणारा असून, यामुळे उपस्थितांनाही गलबलून आले.