बेळगाव : चेन्नई - बेळगाव - चेन्नई सेक्टरमध्ये इंडिगो कंपनीने आपल्या बेळगाव - चेन्नई या नव्या मार्गावरील विमानसेवेचा आज गुरुवारपासून शुभारंभ केला आहे. बेळगाव विमानतळाचे संचालक राजेशकुमार मौर्य यांनी फीत कापून दीपप्रज्वलन करत विमानसेवेचा प्रारंभ केला. यावेळी एटीएम राजेश विजयकुमार, एजीएम (सीएनएस) पी. एस. देसाई, टर्मिनल मॅनेजर बी. जी. रेड्डी, केएसआयएसएफ सिक्युरिटी हेड इराप्पा वाली, इंडिगोचे स्टेशन मॅनेजर आणि अन्य विमान कंपन्यांचे स्टेशन मॅनेजर तसेच प्रवासी उपस्थित होते. दीपप्रज्वलनानंतर मौर्य आणि चेन्नईला जाणारा पहिला प्रवासी या उभयतांनी केक कापला. यावेळी संचालक राजेशकुमार मौर्य यांनी चेन्नई सेक्टरमध्ये विमानसेवा सुरू केल्याबद्दल इंडिगोचे स्टेशन मॅनेजर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. हवाईमार्गे बेळगावला जोडले जाणारे चेन्नई हे ११वे शहर असून, इंडिगोसाठी बेळगाव येथून तिसरे शहर आहे. आता इंडिगो, अलाईन्स एअर, स्टार एअर, स्पाईस जेट आणि ट्रू जेट अशा एकूण पाच विमान कंपन्यांच्या हवाई सेवेद्वारे बेंगलोर, हैदराबाद, म्हैसूर, कडप्पा, तिरुपती, सुरत, अहमदाबाद, इंदोर, मुंबई, पुणे व चेन्नई बेळगावशी जोडले गेले आहेत.
दरम्यान, बेळगाव विमानतळावर गुरुवारी सकाळी १०.२५ वाजता आगमन होऊन १०.५५ वाजता चेन्नईला रवाना झालेल्या इंडिगोच्या ६ ई -७१३१/७१३२ या विमानाला विमानतळाच्या अग्निशामक दलातर्फे ‘वॉटर सॅल्युट’ देण्यात आला. बेळगाव - चेन्नई दरम्यान आठवड्यातून तीन दिवस म्हणजे मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी इंडिगो विमानसेवा उपलब्ध असेल.