इचलकरंजी : येथील इंदिरा महिला सहकारी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्ष इंदुमती कल्लाप्पांना आवाडे (आऊ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८६ वर्षांच्या होत्या.
राज्यातील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आऊ यांचे मूळ गाव कर्नाटकातील भोज (ता चिकोडी) आहे. माजी खासदार कल्लाप्पांना आवाडे यांच्या त्या पत्नी आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्या त्या आई होत. इंदिरा गांधी महिला सहकारी सूत गिरणीच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत.आज दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या इचलकरंजीत आल्या . कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या राजकीय, सामाजिक, सहकार वाटचालीत त्यांनी मोठे सहकार्य केले. देशातील पहिल्या इंदिरा गांधी महिला सहकारी सूतगिरणीच्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या. या सूतगिरणीच्या उभारणीत त्यांची मोलाची कामगिरी होती.
त्यांच्या पश्चात पती कल्लाप्पाण्णा आवाडे, मुलगा प्रकाश आवाडे, जवाहर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष उत्तम आवाडे, स्नुषा इचलकरंजीच्या माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, नातू कल्लाप्पांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे व परतवंडे असा मोठा परिवार आहे. दुपारी तीन वाजता निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
इंदुमती आवाडे या धार्मिक स्वभावाच्या होत्या. सामाजिक कार्याचीही त्यांना आवड होती. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध संस्थांचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.