लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : सरोज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने स्वर्गीय परशुराम जाधव बापू यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली कोल्हापुरातील श्री देवी इंदुमती बोर्डिंगची नूतन इमारत शाहू छत्रपती यांच्या हस्ते शनिवारी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी बोर्डिंग व्यवस्थापनाकडे सुपूर्द करण्यात आली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.
समाजातील वेगवेगळ्या जाती-धर्माच्या गरजू आणि हुशार विद्यार्थ्यांची शिक्षण घेत असताना गैरसोय होऊ नये म्हणून राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूरमध्ये अनेक वसतिगृह व बोर्डिंगची स्थापना केली. शाहू महाराजांच्या याच दूरदृष्टीने कोल्हापूरला ‘विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांची नगरी'' म्हणून ओळख प्राप्त झाली.
या इमारतीला सुमारे १२५ वर्षे पूर्ण झाल्याने या इमारतीची डागडुजी करणे गरजेचे होते आणि त्यासाठी सरोज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक दीपक जाधव आणि भरत जाधव यांनी आपले वडील बापू जाधव यांच्या स्मरणार्थ ही इमारत बांधून दिली. कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचे हे अनोखे उदाहरण आहे.
राजर्षी शाहू महाराज यांचे मागासवर्गीय कल्याणाबाबत उदात्त धोरण होते. असेच धोरण राज्य शासनाचे असून, समाज कल्याण विभाग कोल्हापूर यांच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या जिल्ह्यातील ४६ वसतिगृहांमध्ये अत्याधुनिक लॅब विकसित करण्यात येणार आहे.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, सरोज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक दीपक जाधव व भरत जाधव, श्री देवी इंदुमती बोर्डिंगचे चेअरमन दुर्वास कदम, माजी उपमहापौर भूपाल शेटे, बोर्डिंगचे व्हाईस चेअरमन किशोर कटके, अरुण सातपुते, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, माजी नगरसेविका वृषाली कदम, समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे, अनिल घाटगे यांच्यासह बोर्डिंगचे सर्व संचालक उपस्थित होते.
फोटो ओळी : सरोज ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या वतीने बांधण्यात आलेल्या कोल्हापुरातील श्री देवी इंदुमती बोर्डिंगच्या नूतन इमारतीचे हस्तांतरण शनिवारी शाहू छत्रपती यांच्या हस्ते व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चावी देऊन झाले. (फोटो-२६०६२०२१-कोल-इंदुमती बोर्डिंग)