जयसिंगपूर : उदगाव (ता. शिरोळ) येथील ल. क़ औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी पावसाच्या पाण्याबरोबर शेतकऱ्यांच्या शेतात सोडल्यामुळे ते उदगाव फकीर रस्ता ते धरणग्रस्त वसाहत रस्त्यालगत शेतीच्या पिकात साचल्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या परिसरात दुर्गंधी येत असल्यामुळे पुन्हा एकदा सांडपाणी निचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. गेल्या आठवड्याभरापासून संततधार पावसामुळे उदगाव, चिंचवाड परिसरात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून पिके धोक्यात आली आहेत. त्यातच येथील जवळच असणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील विविध कारखान्यांचे सांडपाणी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून थेट शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. येथील पाणी शेतात साचून राहिल्यामुळे फकीर रस्ता व धरणग्रस्त रस्त्याच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी नैसर्गिकरीत्या वाहणाऱ्या पाण्याचा मार्ग बदलल्याने हे पाणी शेतातील पिकात साचून अन्य शेतात पसरत आहे. त्यामुळे पिके धोक्यात आली आहेत. या परिसरात मोठी दुर्गंधी पसरली असून, शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. येथील औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याबाबत प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आंदोलन होत असते. गेल्या दहा वर्षांपूर्वी असेच आंदोलन होऊन सांडपाणी पाईपलाईनद्वारे अर्जुनवाड-चिंचवाड दरम्यान असलेल्या कृष्णा नदीपात्रात सोडले होते, तर अर्जुनवाड येथील ग्रामस्थांनी याबाबत आंदोलन करून कृष्णा नदीत सोडलेल्या पाण्यावर बंदी घातली होती. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याचे शुद्धिकरण होऊन ते अन्य ठिकाणी वापरले जात होते. मात्र, सध्या थेट सांडपाणी शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. तरी लोकप्रतिनिधींनी याबाबतची दखल घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी मागणी उदगाव, चिंचवाड, अर्जुनवाड पसिरातील शेतकरी वर्गातून होत आहे.
औद्योगिक वसाहतीचे सांडपाणी शेतात
By admin | Published: July 18, 2016 11:40 PM