शिरोळ : नव्या उद्योग निर्मितीसाठी महाराष्ट्र लघुउद्योग विकास संस्था निर्माण करण्याचे शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. औद्योगिकरण क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एक आहे. यापुढील काळात मोठे उद्योग व लघुउद्योगाच्या उभारणीत योगदान दिल्यास नंबर वन असणारा महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रात ‘ए-वन’ करू, असे मत राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केले.शिरोळ येथे पुष्पक चित्रमंदिर कार्यालयात आयोजित उद्योजकांच्या महामेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. तत्पूर्वी शिरोळ-कुटवाड मार्गावर नव्याने स्थापन झालेल्या दीपरेखा इंडस्ट्रियल पार्क संस्थेचा पायाभरणी मंत्री देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी कामगारमंत्री भास्करराव जाधव होते. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक रणजितसिंह पाटील यांनी प्रास्ताविकात दीपरेखा इंडस्ट्रियल संस्थेची माहिती विषद केली. येत्या काळात उद्योग उभारून १५०० लोकांना रोजगार उपलब्ध होणार असून, औद्योगिक क्षेत्रातील राज्यातील आदर्श पार्कची निर्मिती होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. देसाई म्हणाले, शिरोळसारख्या ग्रामीण भागात दीपरेखा औद्योगिक पार्कची उभारणी होत असल्याने उद्योजकांना संधी प्राप्त झाली आहे. या प्रकल्पास शासनाचे सहकार्य लाभेल. परदेशी कंपन्या राज्यात उद्योग सुरू करण्यास तयार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. दलितमित्र डॉ. अशोकराव माने म्हणाले, शासनाने सहकारी औद्योगिक वसाहतीला प्रोत्साहन देऊन भरीव निधीची तरतूद केली पाहिजे. माजी मंत्री भास्कर जाधव म्हणाले, प्रदूषण विरहित असणारा दीपरेखा पार्क प्रकल्प मॉडेल म्हणून नावारूपास येईल. कार्यक्रमास गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, उद्योगपती विनोद घोडावत, ल. क. अकिवाटे, आ. सुजित मिणचेकर, गोव्याचे माजी मंत्री व्यंकटेश देसाई, मुरलीधर जाधव, उपसरपंच पृथ्वीराज यादव, दिलीप पाटील-कोथळीकर, रामचंद्र डांगे, वैभव उगळे, विशाल जगदाळे, राजेश जाधव, संभाजीराजे नाईक, सतीश मलमे यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. (प्रतिनिधी)
औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र ‘ए-वन’ करू
By admin | Published: September 24, 2015 11:23 PM