कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात देशाची आर्थिक घडी विस्कटू नये यासाठी उद्योग सुरू ठेवण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्या औद्योगिक कामगारांचा विमा उतरवण्यात यावा, अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्यावर्षीपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. या काळात शासकीय आणि खासगी कार्यालयामध्ये ५० टक्के, १५ टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्याचे आदेश देण्यात आले. शासनाच्या वतीने इतर क्षेत्रातील कामगारांना विविध मदतीची पॅकेज जाहीर झाली आहेत; परंतु राज्यातील औद्योगिक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचा मात्र विचार झालेला नाही. तसेच कंपन्यांही सुरू ठेवण्यात आल्या आहेत. यामुळे अनेक कामगारांचा कोरोनामुळे मृत्यूही झालेला आहे. अनेक कामगारांची पगार कपात झाली आहे. त्यामुळे कामगार आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. तेव्हा कामगारांना कोरोना येाद्धा म्हणून त्यांचा विमा उतरवावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.