कोल्हापूर : ‘यूएस-महाराष्ट्र डेव्हलपमेंट कौन्सिल’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील उद्योगांना बळकटी देण्याचा प्रयत्न आहे. कोल्हापुरातील उद्योजकांकडे निर्यात क्षमता असून, त्यासाठी त्यांनी पुढे यावे. आम्ही मदत करण्यास तयार असल्याचे आवाहन कौन्सिलचे समन्वयक किशोर गोरे यांनी केले. उद्यमनगर येथील उद्योजकांशी शुक्रवारी गोरे यांची बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी कौन्सिलचा हेतू स्पष्ट केला. ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या नंबर वन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येथील उद्योगधंद्यांना परदेशी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ज्ञानेश्वर मुळे यांच्या प्रेरणेतून ‘यूएस-महाराष्ट्र डेव्हलपमेंट कौन्सिल’ची स्थापना केली आहे. राज्यातील उद्योजक व अमेरिकेत निर्यात करणाऱ्यांना मदत करणे, यासाठी आमची कौन्सिल प्रयत्नशील राहणार आहे. कौन्सिलमध्ये विविध क्षेत्रांतील दहा ते बाराजणांचा टास्क फोर्स तयार करण्यात आला असून, येथून येणारे प्रस्ताव त्यांच्याकडे जाणार आहेत. त्यातून निवड करून निर्यातीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मध्यंतरी नाशिकची द्राक्षे नाकारली होती, यासाठी निर्यात कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. अमेरिकेतील काही उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास तयार आहेत. सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये परदेशातील काही उद्योजक औरंगाबाद, पुणे, नाशिक व कोल्हापूर या ठिकाणी भेटी देणार आहेत. निर्यातीसाठी आम्ही प्लॅटफॉर्म तयार केला असून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोरे यांनी केले. कौन्सिलचे सदस्य होण्यासाठी कोणतेही शुल्क नसून ज्यांना सहभागी व्हायचे आहे, त्यांनी वेबसाईटवरून आपले प्रस्ताव दाखल करावेत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विविध उद्योजकांनी निर्यातीबाबत प्रश्न उपस्थित केले. यावेळी बाबासाहेब कोंडेकर, अतुल धारवाडे, कमलाकांत कुलकर्णी, प्रकाश चरणे, राजू पाटील, सचिन पाटील, शाम देशिंगकर, हरिचंद्र धोत्रे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)ब्रँडिंग नसल्यानेच चप्पल, गूळ मागे चप्पल, गूळ, साज यांसह कोल्हापूरच्या अनेक गोेष्टी प्रसिद्ध आहेत; पण त्यांचे ब्रॅँडिंग नसल्याने तत्कालीन फायद्यासाठी वस्तूंविषयी अर्धवट माहितीच बाहेर गेल्याने नुकसान झाल्याचे गोरे यांनी सांगितले. दोनशेचा शर्ट बाराशे रुपयांनाइचलकरंजीमधील उद्योजकांनी काही अडचणी सांगितल्या आहेत. इचलकरंजीमधील कपडे सुरत, अहमदाबादमार्गे न्यूयॉर्कला निर्यात होतात. त्यामुळे येथील दोनशे रुपयांचा शर्ट न्यूयॉर्कमध्ये बाराशे रुपयांना मिळतो. हीच निर्यात जर मुंबईमार्गे झाली तर आमचा फायदा होईल, अशी मागणी उद्योजकांनी केल्याचे गोरे यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या उद्योजकांनी निर्यातीसाठी पुढे यावे : गोरे
By admin | Published: March 04, 2016 11:21 PM