संतोष मिठारी
कोल्हापूर : येथील महापुरामुळे जिल्ह्यातील उद्योग, व्यापार आणि व्यवसाय क्षेत्रांतील आठ दिवसांतील सहा हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली; त्यामुळे सुमारे ११०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घुसल्यामुळे नुकसान झालेल्या उद्योग, दुकानांची माहिती संकलित करण्याचे काम कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि विविध औद्योगिक संघटनांकडून सुरू आहे.कोल्हापूरमध्ये सोमवार (दि. ५) पासून महापुराचे पाणी वाढू लागले. त्याची तीव्रता दुसऱ्या दिवसापासून वाढली. ग्रामीण आणि शहरी भागात विविध ठिकाणी पुराचे पाणी घुसले. मार्ग बंद राहिले. त्याचा परिणाम शहरातील व्यापार, व्यवसायावर झाला. पुरामुळे गेल्या आठ दिवसांतील सुमारे तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. शहरात अन्नधान्य, तेल, तयार कपडे, वाहनांचे सुट्टे भाग, आदी क्षेत्रांतील १५ हजारांहून अधिक व्यापारी, व्यावसायिक आहेत. उलाढाल थांबल्याने त्यांना ३00 कोटींचा फटका बसला आहे.जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतींना सोमवारी सुट्टी असते. शिवाजी उद्यमनगर, शिरोली, गोकुळ शिरगाव, हातकणंगले-कागल या मोठ्या औद्योगिक वसाहतीतील उद्योग एकमेकांशी निगडीत आहेत. या उद्योगांचे काम एकमेकांवर अवलंबून आहे. तब्बल पाच दिवस पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग बंद राहिल्याने कच्चा माल, विविध प्रक्रियेसाठी सुट्ट्या भागांची वाहतूक करता आली नाही; त्यामुळे शिरोली औद्योगिक वसाहत ९० टक्के, तर गोकुळ शिरगाव आणि हातकणंगले-कागल औद्योगिक वसाहतीतील काम ६० ते ७० टक्क्यांपर्यंत बंद राहिले.
बंद झालेले रस्ते आणि इंधन पुरवठा होत नसल्याने कामगारदेखील कंपन्यांमध्ये कामावर येऊ शकले नाहीत. या सर्व औद्योगिक वसाहतींमध्ये रोज सरासरी ५00 कोटींची उलाढाल होते. महापुरामुळे सहा दिवसांतील तीन हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. पुणे, मुंबईसह देशातील अन्य कंपन्यांसमवेत त्यांच्या करारानुसार उत्पादने पुरविता आली नाहीत; त्यामुळे सुमारे ८०० कोटींचे नुकसान झाले आहे.
पुराचे पाणी शिरल्याने वर्कशॉप आणि अनेक दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच मंदीची स्थिती असताना त्यात महापुराने तडाखा दिल्याने झालेल्या नुकसानातून सावरण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांतून होत आहे.
वीजेचे सर्वाधिक दर आणि मंदीच्या स्थितीत टिकून राहण्यासाठी कोल्हापूरचे औद्योगिक क्षेत्र संघर्ष करत आहे. त्यातच आता महापुराचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राचे साधारणत: ८०० कोटींचे नुकसान झाले. ते लक्षात घेऊन सरकारने तातडीने मदत द्यावी.- राजू पाटील, अध्यक्ष, शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन.
कोल्हापूर शहरातील लहान-मोठ्या १५ हजार व्यापारी, व्यावसायिकांची गेल्या आठ दिवसांतील सुमारे ३ हजार कोटींची उलाढाल ठप्प झाली. हे सर्वजण ५ ते १० टक्के मार्जिनमध्ये व्यवसाय, व्यापार करतात. त्यांचे ३00 कोटींचे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घुसल्याने दुकानांचे झालेले नुकसान वेगळे आहे. त्याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्याच्या आर्थिक विकासात योगदान देणाºया उद्योजक, व्यापारी, व्यावसायिकांना सरकारने मदत करावी.- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज.
इंधन नसल्याचाही फटकामहामार्ग बंद राहिल्याने गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यात इंधन उपलब्ध झाले नाही; त्यामुळे नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू राहिली नाही. त्याचा परिणाम कामगारांची उपस्थिती, पाणी नसलेल्या ठिकाणाच्या कंपन्यांमध्ये उत्पादने नेण्यावर झाला.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
- जिल्ह्यातील उद्योगांची संख्या : २० हजार
- शहरातील व्यापारी, व्यावसायिकांची संख्या : सुमारे १५ हजार