यड्राव : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व शासकीय आदेशाप्रमाणे परवानगी देण्यात आलेली उत्पादने निकषानुसार सुरू ठेवण्याचा व इतर औद्योगिक घटक बंद ठेवण्याचा निर्णय येथील पार्वती औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांनी घेतला आहे.
पार्वती औद्योगिक वसाहतीच्या कार्यालयामध्ये पार्वती इंडस्ट्रियल इस्टेट मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे पदाधिकारी व औद्योगिक वसाहतीमधील सर्व उद्योजकांची बैठक झाली. यावेळी शासनाकडून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंध उपाययोजना राबविणेकामी, ब्रेक द चेन अंमलबजावणीअंतर्गत उत्पादने, औद्योगिक क्षेत्रातील घटकांची पडताळणीबाबत तसेच शासनाच्या आदेशानुसार परवानगी देण्यात आलेल्या उत्पादनाव्यतिरिक्त इतर औद्योगिक घटक बंद ठेवण्याबाबत आलेल्या परिपत्रकाची संपूर्ण माहिती पार्वती औद्योगिक वसाहतीचे व्यवस्थापक अभिजित पाटील, केदार टाकवडेकर व चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावर सर्व उद्योजकांनी कोणकोणते उद्योग सुरू ठेवणे, कोणते उद्योग बंद ठेवणे याबाबत सविस्तर चर्चा केली. चालू ठेवणाऱ्या उद्योगाची स्वतंत्र यादी व बंद राहणाऱ्या उद्योगांची स्वतंत्र यादी तयार करून शासनास सादर करून शासनाच्या निकषाप्रमाणे उद्योग सुरू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
याप्रसंगी महावीर खवाटे, बाळासाहेब केटकाळे, दामोदर मालपाणी, शीलकुमार पाटील, सचिन मगदूम, शेखर देशपांडे, तुषार सुलतानपुरे, अमोघ कुलकर्णी, मंडल अधिकारी डी. बी. गायकवाड, तलाठी नितीन कांबळे यांच्यासह पार्वती औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक उपस्थित होते.