कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथे कात्यायनी कॉम्प्लेक्स परिसरातील एका बोळात बुधवारी (दि. २३) सकाळी मृतावस्थेतील स्त्री जातीचे अर्भक आढळले. प्रशांत जवळीमठ यांनी याबाबतची माहिती देताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृत अर्भक उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवले. दरम्यान, अर्भक टाकणा-या संशयितांचा शोध सुरू असल्याची माहिती करवीर पोलिसांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, कळंबा येथील कात्यायनी कॉम्प्लेक्स परिसरात प्रशांत जवळीमठ यांच्या घराच्या मागे असलेल्या बोळात कापडात गुंडाळलेले मृतावस्थेतील अर्भक बुधवारी सकाळी आढळले. हा प्रकार लक्षात येताच जवळीमठ यांनी करवीर पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक निवास पवार, हवालदार दत्ता बांगर, संग्राम पाटील घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून त्यांनी उत्तरीय तपासणीसाठी अर्भक सीपीआरमध्ये पाठवले. पूर्ण वाढ झालेले अर्भक अज्ञाताने नाळेसहीत टाकले होते. हा प्रकार लक्षात येताच परिसरातील बघ्यांनी गर्दी केली. घरातच प्रसूती झाल्यानंतर संशयितांनी मध्यरात्रीच्या सुमारास अर्भक फेकले असावे. त्याचा मृत्यू कधी झाला, याची माहिती उत्तरीय तपासणीनंतर मिळेल असे उपनिरीक्षक निवास पवार यांनी सांगितले.
कोल्हापुरातील कळंब्यात मृतावस्थेत आढळले अर्भक, संशयितांचा शोध सुरू
By उद्धव गोडसे | Published: August 23, 2023 1:57 PM