कोल्हापूर : कोल्हापूर शहरात कोरोना संसर्गाचा भडका उडाला असून मे महिन्यात कसबा बावडा, कदमवाडी, राजारामपुरी, फुलेवाडी रिंगरोड, आपटेनगर, कैलासगडची स्वारी मंदिर या प्रभागात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मे महिना पूर्ण व्हायला अद्याप तीन दिवस बाकी असताना सर्वाधिक ८१९२ कोरोना रुग्णांची नोंद झाली.
कोल्हापूर महापालिका क्षेत्रात अपेक्षेपेक्षा कोरोनाचा संसर्ग जास्त आहे. एप्रिल महिन्यात पाच हजारावर रुग्ण आढळले असून मे महिन्यात तर विक्रमी आठ हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जात असला तरी रुग्णांची संख्या वाढत आहे, आणि संसर्गाचा फैलाव शहरातील अनेक घरापर्यंत पोहचला आहे हे वास्तव आहे. शहरातील सध्याचे चित्र पाहता कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली आहे.
कसबा बावडा पूर्व बाजू १५८, कसबा बावडा हनुमान तलाव १५७, कदमवाडी २०२, ताराबाई पार्क २०७, मुक्त सैनिक वसाहत १६२, खोलखंडोबा १८५, राजारामपुरी ३५३, कैलासगडची स्वारी मंदिर २५८, संभाजीनगर २२३, रामानंदनगर २२९, फुलेवाडी रिंगरोड २३४, सानेगुरुजी वसाहत २००, आपटेनगर २२७, जीवबानाना पार्क १५० आदी प्रभाग रुग्णवाढीत आघाडीवर आहेत. दि. १ मेपासून ते शुक्रवारपर्यंतची ही आकडेवारी आहे.
कोरोनाला रोखण्यात शहरातील काही प्रभागातील नागरिक यशस्वी झाले आहेत. राजारामपुरी एक्स्टेंशन ४४, दौलतननगर ४०, पांजरपोळ ४५, पंचगंगा तालीम २६, शिवाजी विद्यापीठ २२, महाडिक वसाहत ३१, कनाननगर २७, व्हीनस कॉर्नर ४२, पोलिस लाईन १५ तर शाहू कॉलेज २७ या प्रभागांचा त्यामध्ये समावेश आहे. प्रभाग क्रमांक ६२ बुध्द गार्डन या प्रभागात तर गेल्या एक महिन्यात केवळ एकच कोरोना बाधित रुग्ण आढळून आला आहे.
- मे महिन्यातील रुग्ण - (दि. १ ते २८)
- कोल्हापूर शहरातील रुग्ण - ७७०६
- इतर जिल्ह्यातील रुग्ण - २७५
- इतर राज्यातील रुग्ण - २११
- एकूण रुग्ण - ८१९२
- कोल्हापूर शहरातील वर्षभरातील रुग्ण - ३१ हजार २०६
- आतापर्यंत कोरोनाने मयत रुग्णांची संख्या - ७२८