किती हातांना काम दिले हे नरकेंनी सांगावे --: पी. एन. पाटील यांची विचारणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:59 AM2019-10-15T00:59:50+5:302019-10-15T01:02:15+5:30
‘विकास केला..विकास केला..’ अशा वल्गना करणाऱ्या आमदार चंद्रदीप नरके यांनी मतदारसंघातील किती तरुणांच्या हाताला रोजगार दिला, हे जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत दिले. लोकांत सहानुभूतीची लाट तयार झाली असून, माझा विजय त्यांनीच निश्चित केला आहे. आमदार सतेज पाटील ताकदीने प्रचारात उतरल्याने मोठे बळ मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
विश्वास पाटील ।
कोल्हापूर : ‘रस्ते केले व हॉल बांधले म्हणजे विकास नव्हे, ते आमदाराचे प्राथमिक कामच आहे. तुम्ही मतदारसंघात किती नवे प्रकल्प आणले, किती तरुणांच्या हाताला काम दिले, किती संस्थांची उभारणी केली, याचा हिशेब त्यांनी द्यावा. आम्ही दुसऱ्यांनी काढलेल्या संस्थांवर उड्या मारून बसलो नाही. स्वत: संस्थांची स्थापना केली व त्या अतिशय चांगल्या चालवून दाखविल्या. दिंडनेर्लीच्या फोंड्या माळावर सूतगिरणीचा प्रकल्प उभारला. तिथे सुमारे ८०० हून अधिक तरुणांच्या हाताला काम दिले. कोल्हापूर जिल्हा बँक, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ, भोगावती साखर कारखाना, श्रीपतराव दादा बँक या संस्थांच्या माध्यमातून सुमारे दोन हजारांहून जास्त तरुणांना नोकºया दिल्या. या तरुणांकडून अर्धा कप चहाही न घेता त्यांच्या आयुष्याची घडी बसवून दिली, असे पी.एन. यांनी सांगितले.
एकदा पराभव झाला, तर पुढची पाच वर्षे लोक शोधून सापडत नाहीत. मी सातत्याने मतदारसंघातील जनतेच्या सुखदु:खात सहभागी झालो. मतदारसंघातील माणूस म्हणजे माझे कुटुंब आहे, असे समजून त्यांच्या अडीअडचणीला धावून गेलो. म्हणूनच आजही मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी ठामपणे आहे. प्रसंग कोणताही असो, साहेबांना एक फोन केला, की मला काही ना काही मदत मिळणार, हा विश्वास त्याला आहे. हे पाठबळ आणि अकृत्रिम प्रेम मला आजपर्यंत मिळाले, हे मी माझे भाग्य समजतो; त्यामुळे या जनतेनेच आता माझ्या विजयाचा विडा उचलला आहे.’
या निवडणुकीत विजयाचा आत्मविश्वास नक्की वाटतो, त्याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत लोक मोठ्या संख्येने काँग्रेसमध्ये आले आहेत. मी स्वत: १४ हजार लोकांच्या गळ्यात काँग्रेसचा स्कार्फ घालून त्यांचा सन्मान केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अत्यंत ताकदीने आणि मनापासून प्रचारात उतरली आहे. या पक्षाचे ३० हजारांहून अधिक मतदान या मतदारसंघात आहे. दोन्ही काँग्रेसची एकजूट झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सक्रीय पाठिंबा दिला आहे. गगनबावडा तालुक्यात पी. जी. शिंदे हे माझ्या प्रचारात राबत आहेत. पन्हाळा, गगनबावड्यासह करवीरच्या उत्तरेकडील वडणगेपासून शियेपर्यंतच्या परिसरात नरके यांच्याविरोधात जनतेतून मोठा उठाव आहे. लोकांनी यावेळी बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे पी. एन. पाटील यांनी सांगितले.
शेकापने आघाडीधर्म पाळावा
ज्या ज्या वेळी मित्रपक्षांशी आघाडी झाली, तेव्हा प्रामाणिकपणे आघाडीधर्म पाळून मी प्रचार केला आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक तसेच संभाजीराजे, धनंजय महाडिक यांच्यावेळी जनतेला त्याचा प्रत्यय आला आहे. जातीयवादी शक्तींना थोपविण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या आघाडीत शेकापदेखील आहे. त्यांनी या मतदारसंघातच वेगळी भूमिका का घेतली, हे समजत नाही. या पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांनी आघाडीधर्म पाळून सहकार्य करावे.
भोगावतीची घडी बसविली
भोगावती कारखान्याची गेल्या अडीच वर्षांत घडी बसविण्याचा प्रयत्न केला. उसाची बिले दिली. कामगारांचा पगार दिला. एक रुपयांचा भत्ता न घेता कारखान्याचा कारभार करत आहे. यापूर्वी घेतलेले ५८० कर्मचारी मला भेटायला आले होते. त्यांना ‘तुम्ही माझे वैरी नाही. तुम्ही काम करत करा,’ तुमच्या नोकरीवर गदा येणार नाही, असे आश्वासन दिले. ते सर्व विश्वासाने काम करत आहेत, असे पी. एन. पाटील यांनी सांगितले.
राजकारणात आल्यापासून गेल्या ३४ वर्षांत एकच पक्ष, एकच विचार व गांधी घराण्याला एकच नेता मानून राजकारण करत आलो. अनेक पक्षांतून आॅफर आल्या. प्रलोभने दाखविली गेली; परंतु काँग्रेसची विचारधारा सोडली नाही. पराभूत झालो म्हणून कधी हार मानली नाही.
-पी. एन. पाटील