साके : शहराबरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खबरदारी म्हणून लोकांच्या रोगप्रतिकारक शक्तीत वाढ व्हावी व कोरोनाशी मुकाबला करता यावा यासाठी अनंतशांती सामाजिक बहुउद्देशीय संस्था (महाराष्ट्र राज्य) या संस्थेचा दरवर्षी पुढाकार असतो. संस्थेच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करून कोराना काळात नागरिकांची प्रतिकारशक्ती वाढविण्याचे काम केले आहे. अनंतशांती संस्थेचे समाजिक कार्य म्हणजे नागरिकांना मोलाचे योगदान ठरत असल्याचे प्रतिपादन तालुका संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब तुरंबे यांनी केले.
साके (ता. कागल) येथे अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
अनंतशांती बहुउद्देशीय सामाजिक संस्था वेगवेगळे उपक्रम दर महिन्याला राबवीत असते व लोकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करीत असते. आजपर्यंत संस्थेने ज्या ज्या वेळी समाजात संकटे आली, त्या त्या वेळी लोकांसाठी पुढाकार घेतलेला आहे. गेली १३ वर्षे हे समाजकार्य जोपासले आहे व राज्यात आपला नावलौकिक मिळविला आहे. पूर काळातही संस्थेन ५० हून अधिक आरोग्य शिबिरे घेऊन, मोफत धान्य वाटप करून एक आदर्श निर्माण केला होता. आता संस्थेमार्फत दीड लाख लोकांना गोळ्यांचे वाटप करणार असल्याचे संस्थापक मा. भगवान गुरव यांनी सांगितले. यावेळी अध्यक्षा डाॅ. माधुरी खोत, सचिव अरुणा पाटील, अमर निळपणकर, युवराज खोत, मारुती निऊंगरे, माजी सरपंच चंद्रकांत निऊंगरे, ग्रामपंचायत सदस्या रंजना तुरंबे, बापूसो पाटील-कागले, उपसरपंच निलेश निऊंगरे, रवींद्र जाधव, सुजय घराळ, अंगणवाडी सेविका मंगल पाटील, जयश्री निऊंगरे, उज्ज्वला जाधव, रेखा पाटील, आनंदी पाटील, आदी उपस्थित होते.