विद्यमान नगरसेवक : सत्यजित कदम
आताचे आरक्षण: अनुसूचित जाती
दीपक जाधव
कदमवाडी : महापालिकेतील भाजप-ताराराणीचे नगरसेवक सत्यजित कदम यांचे होमग्राऊंड असलेला प्रभाग क्रमांक ८; भोसलेवाडी-कदमवाडी हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला असला तरी, हा प्रभाग आपल्या ताब्यात घेण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून जोरदार प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. प्रभागात आरक्षण आल्याने सत्यजित कदम यांना दुसऱ्या मतदारसंघाचा शोध घ्यावा लागणार आहे. मात्र, प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप-ताराराणीचा उमेदवार कोण, याचा फैसलाही कदम हेच करणार असल्याने त्यांच्यासाठीही या प्रभागातील निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. कदम यांच्या पसंतीच्या उमेदवाराला जनता स्वीकारणार की विरोधक प्रभागात शिरकाव करणार, याची उत्सुकता आहे. गतवेळी हा प्रभाग खुला होता. भाजप-ताराराणीच्या सत्यजित कदम यांनी शिवसेनेचे अरविंद मेढे यांचा पराभव केला होता. यंदा हा प्रभाग अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला असला तरी इच्छुकांची संख्याही मोठी आहे. गतवेळी भाजप-ताराराणीला कडवी झुंज दिलेल्या शिवसेनेनेही यंदा हा प्रभाग ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेकडून मारुती सूर्यवंशी यांचे नाव आघाडीवर आहे, तर दुसरीकडे विद्यमान नगरसेविका कविता माने यांचे पती वैभव माने हे भाजप-ताराराणीकडून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेसकडून राणी ऊर्फ अस्मिता पाटील व दीपकसिंह पाटील यांची नावे चर्चेत आहेत. राजेंद्र आत्याळकर हेही अपक्ष म्हणून नशीब अजमावण्याची शक्यता आहे.
सोडविलेले नागरी प्रश्न : प्रभागातील काॅलनी, सोसायटीत अंतर्गत रस्ते, गटर्सची कामे झालेली आहेत. काही ठिकाणी अंतर्गत रस्त्याचे क्राॅंक्रिटीकरण केले आहे. महालक्ष्मीनगर व भोसलेवाडी येथे अंतर्गत विद्युत वाहिनीचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. प्रभागात पूर्ण एलईडी दिवे लावले आहेत. व्यायामशाळा नूतनीकरण, खेळाचे मैदान सुशोभिकरण ही कामे केली आहेत.
रखडलेले प्रश्न : भागात काही ठिकाणी रस्ते खराब आहेत. महादेव मंदिर भोसलेवाडी येथे गटर्सचा प्रश्न प्रलंबित आहे. गणपतराव शिंदे व्यायामशाळा नूतनीकरणानंतरही बंद आहे.
कोट :
प्रभागातील रस्ते, गटर्स, सांडपाणी, पाण्याची टाकी, विजेची कामे पूर्ण केल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत जरी आरक्षण बदलले असले तरी भाजप ताराराणीकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारास मतदार संधी देतील. सत्यजित कदम. नगरसेवक गत निवडणुकीतील प्रमुख उमेदवार. सत्यजित कदम २५११ (विजयी) (भाजप ताराराणी), अरविंद मेढे १६५७ (शिवसेना), मकरंद जोंधळे ८६ (राष्ट्रवादी), दीपकसिंह पाटील २२ (काँग्रेस).
फोटो ३१ प्रभाग८
ओळी
प्रभाग क्रमांक ८ भोसलेवाडी-कदमवाडी येथील महादेव मंदिर भोसलेवाडी येथील सांडपाणी निचरा होण्यासाठी गटर्स नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहत आहे.