खासगी रुग्णालयांमध्ये ताप, सर्दी, खोकला, उलट्या, जुलाब, अंगदुखी, डोळे येणे आदी कारणास्तव उपचारासाठी रुग्ण येतात. नंतर ते बाधित असल्याचे आढळून येत आहेत. अशा रुग्णांची वेळीच तपासणी होत नाही. उशिरा निदान आणि उपचारांमुळे रुग्ण गंभीर अवस्थेत कोविड रुग्णालयात दाखल होतात. अशावेळी त्यांचे प्राण वाचविणे शक्य होत नाही. त्यावेळी या रुग्णांनी खासगी दवाखान्यात उपचार घेतल्याचे आढळून येते.
अशा घटना घडू नयेत यासाठी कोवीडसदृश लक्षणे असलेल्या रुग्णांनी आरएटी किंवा आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. रुग्णांची नोंद ठेवून त्यांचा पत्ता, भ्रमणध्वनी याची सर्व माहिती प्रशासनाला द्यावी. याबाबत कोणतीही कसूर करू नका, अन्यथा उशिरा दाखल रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित खासगी रुग्णालयाची राहणार आहे.
--
* प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध नको
गडहिंग्लज विभागातील सर्व केमिस्ट, फार्मासिस्ट यांनी औषधे खरेदीसाठी आलेल्या व्यक्तींना डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधे देऊ नयेत. प्रिस्क्रिप्शनशिवाय रुग्ण औषधांची मागणी करतात आणि आपल्याकडूनही ती दिली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. यापुढे कोविडसदृश लक्षणे असलेल्या रुग्णांना परस्पर औषधे न देता अशा रुग्णांची माहिती प्रशासनाला द्या, अशी सूचनाही प्रांताधिकाऱ्यांनी विभागातील औषध विक्रेत्यांना दिल्या आहेत.