कोल्हापूर : खरीप हंगामातील भात खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात तीन ठिकाणी आधारभूत किंमत खरेदी केंद्रे सुरू करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहेत. तुर्केवाडी (ता. चंदगड), आजरा व बांबवडे (ता. शाहूवाडी) येथे भात खरेदी केंद्रे सुरू केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दिली.खरीप हंगामातील भात पिकासाठी आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार चंदगड तालुका खरेदी-विक्री संघ, तुर्केवाडी, आजरा तालुका खरेदी-विक्री संघ व उदयगिरी शाहूवाडी तालुका खरेदी-विक्री संघ, बांबवडे येथे खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत.
या केंद्रांना सोईसुविधा पुरविणे, केंद्रांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मार्केटिंग फेडरेशनची राहणार आहे. आधारभूत किंमत खरेदी केद्रांचा रोजचा अहवाल विहीत नमुन्यात पणन संचालक व महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन, मुंबई या कार्यालयास सादर करण्याचे आदेश मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती अरुण काकडे यांनी दिली.