कोल्हापूर : एन.सी.सी.च्या वायुसेना विभागातील विद्यार्थ्यांना विमान चालविण्याचे प्रशिक्षण देणे आवश्यक असून, सध्या हे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र केंद्र नाही. कोल्हापूरमधील उजळाईवाडी येथील विमानतळावर वायू विभागात असणाऱ्या छात्रांसाठी विमान चालविण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे, अशी माहिती अॅडशिनल डायरेक्टर जनरल महाराष्ट्र राज्य एन. सी. सी.चे मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांनी दिली.एन.सी.सी. भवन येथे अखिल भारतीय शिवाजी पदभ्रमंती मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हापुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. प्रसाद म्हणाले, राज्यातील हे पहिलेच प्रशिक्षण केंद्र असून, या ठिकाणी सहा व्हायरस एअरक्राफ्ट प्रकारातील विमाने प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
एन. सी. सी.मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासोबतच त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. छात्रांसाठी दर्जेदार गणवेश देण्यासाठी आम्ही टेंडर काढले आहे. लवकरच त्यांना गणवेशही उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.याप्रसंगी ग्रुप कमांडर एन. सी. सी. ब्रिगेडियर आर. बी. डोग्रा, ५ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. कोल्हापूरचे कर्नल आर. के. तिम्मापूर, मेजर व्ही. जे. कांबलीमठ, आदी उपस्थित होते.