तानाजी घोरपडे --हुपरी --औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने राज्य शासन महाराष्ट्र औद्योगिक धोरण २०१३ अंतर्गत औद्योगिक गावे, शहरे, औद्योगिक वसाहतींमध्ये पाायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्याच्या यादीमध्ये रेंदाळ (ता. हातकणंगले) गावचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे येथील वस्त्रोद्योगाला आवश्यक असणारा विद्युत एक्स्प्रेस फिडर, सेंट्रल इन्फ्ल्युएट ट्रीटमेंट प्लँट, रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, विद्युत सबस्टेशन, चाचणी सुविधा केंद्र, आदी अनुषंगिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. रेंदाळ येथे यंत्रमाग व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. या गावाची ‘मिनी वस्त्रनगरी’ म्हणून गेल्या अनेक वर्षांपासूनची ओळख आहे. महाराष्ट्र शासनाने औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी नवीन धोरणांची आखणी केली आहे. पथकाने रेंदाळ येथील वस्त्रोद्योगाची माहिती घेऊन त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठविला होता. शासनाने या अहवालाचा अभ्यास करून ‘महाराष्ट्र औद्योगिक धोरण २०१३’ योजनेचा लाभ रेंदाळ गावाला देण्याचे निश्चित केले आहे. शासनाच्या या निर्णयाची माहिती जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापकांनी ग्रामपंचायतीला पत्राद्वारे कळविली आहे. केंद्राचे अधिकारी गुजर यांनी सरपंच अश्विनी कांबळे व उपसरपंच अभिषेक पाटील यांच्याकडे महाव्यवस्थापकांचे पत्र सुपूर्द केले. यावेळी पंचायत समिती सदस्य शिवाजी पुजारी, ग्रामपंचायत सदस्य राजू नाईक, महेश कोरवी, राजकुमार कोल्हापुरे, रेंदाळ बँकेचे चेअरमन अरुण महाजन, महिपती पाटील, लोयाकत मुजावर, बाबूराव दांडगे, माणिक पतंगे, धवल पाटील, कृष्णात पुजारी, सुभाष पाटील, मधुकर घोडेस्वार, संजय शिंगाडे, रणजित शिंद,े आदी उपस्थित होते. औद्योगिक गावे : वसाहतींची पाहणीया योजनेच्या माध्यमातून खासगी औद्योगिक क्षेत्रे असणारी गावे, शहरे, ओद्योगिक वसाहतीमध्ये आवश्यक असणाऱ्या पायाभूत सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत. विद्युत एक्स्प्रेस फिडर, सेंट्रल इन्फ्ल्युएट ट्रीटमेंट प्लँट, रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, विद्युत सबस्टेशन, चाचणी सुविधा केंद्र यांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या पथकाने जिल्ह्यातील औद्योगिक गावे व औद्योगिक वसाहतींची पाहणी केली होती.
रेंदाळमध्ये वस्त्रोद्योगासाठी पायाभूत सुविधा
By admin | Published: October 27, 2015 10:04 PM