उमेश कांबळे (रा. इचलकरंजी) हा माणगाव येथील फौंड्रीमध्ये कामास होता. तो कामाच्या ठिकाणी जात असताना माणगाव फाटा येथे माणगावकडे वळण घेत असताना मागून परशुराम वडर या दुचाकीने धडक दिली. यामध्ये कांबळे हा डांबरीवर आढळून गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रविवारी सायंकाळी त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात वडील, पत्नी व दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
दरम्यान, माणगाव फाटा येथे मुख्य मार्गानजीक टपरीधारकसह विक्रेते यांनी दुकाने थाटले असून ग्राहक मुख्य मार्गालगत दुचाकीसह चारचाकी वाहन लावतात. माणगावहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या वाहनांना इचलकरंजीहून येणारे वाहन दिसत नसल्याने येथे अपघाताची मालिका सुरू आहे. माणगाव फाटा हा ञिकूट मार्ग असून कोल्हापूर व इचलकरंजीहून भरधाव वेगाने वाहन ये-जा करत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. इचलकरंजी-कोल्हापूर मुख्य मार्गावरील माणगाव फाटा हा प्रचंड वर्दळीचा मार्ग आहे. या मार्गावर पोलीस कर्मचाऱ्यांसह वाहतूक पोलीस विभागाचे कर्मचारी यांचे ये-जा असताना या फाट्यावरील अडथळ्याकडे दुर्लक्ष होत आहे.