सोमवारी दुकाने सुरू करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोल्हापूरमधील दुकानधारकांनी आंदोलन करताच पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली. पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात सगळीकडेच परवानगी देणे गरजेचे असताना इचलकरंजीला जाणीवपूर्वक दुजाभावाची वागणूक दिली आहे, अशी टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी केली. तसेच सोमवारी (दि. १२) दुकाने सुरू करणार. त्याला विरोध झाल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून रस्त्यावरच आंदोलन सुरू करणार, असा इशाराही दिला.
तीन महिने झाले छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. याबाबत व्यापारी संघटना व पोलीस प्रशासनाच्या सहा बैठका झाल्या आहेत. परंतु यावर अजूनही तोडगा निघाला नाही. दरम्यान, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी शुक्रवारी दुकाने सुरू होतील, अशी घोषणा केली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. मात्र, पोलीस प्रशासनाने बंद करण्याचे आवाहन करत कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे आमदार आवाडे यांच्यासह माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन प्रशासनाबरोबर व्यापाऱ्यांना घेऊन बंद खोलीत चर्चा केली. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल, उपअधीक्षक बाबूराव महामुनी व व्यापारी यांची चर्चा झाली. चर्चेनंतर सोमवारी दुकाने सुरूच करणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
चौकटी
सकाळी सुरू, दुपारी बंद
मंत्री यड्रावकर यांनी शुक्रवारी दुकाने सुरू करण्यास सांगितले होते. त्यानुसार व्यापाऱ्यांनी दुकान सुरू केले. पोलीस प्रशासनाने शहर व मुख्य रस्त्यावर फिरून दुकाने बंद करण्याचा इशारा दिला. त्यामुळे सकाळी सुरू केलेली दुकाने पुन्हा दुपारी बंद करण्यात आली. तसेच व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
ताराराणी आघाडीचा पाठिंबा
पोलीस ठाण्यात बैठक झाल्यानंतर उपस्थित व्यापाऱ्यांना संबोधन करताना सागर चाळके यांनी शहरात नेतृत्वाचा धाक कमी झाल्याने दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. सोमवारी दुकाने सुरू करण्यास ताराराणी आघाडीचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले. या वेळी पक्षप्रतोद प्रकाश मोरबाळे उपस्थित होते.
फोटो ओळी
०९०७२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजी शहरातील दुकाने पुन्हा बंद करायला लावल्याने संतप्त व्यापाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. या वेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले.