दोन दिवसांपूर्वी गडहिंग्लज शहरप्रमुखपदी संतोष चिक्कोडे यांची निवड झाली आहे. त्या संदर्भात बैठक घेऊन काही शिवसैनिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. शहरप्रमुख म्हणून सागर कुराडे व अशोक शिंदे हे काम पाहत होते.
पत्रकात म्हटले आहे, गेल्या अनेक लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भगवा झेंडा हाच आपला उमेदवार समजून निष्ठावंत शिवसैनिकांनी काम केले. स्वत:ची आर्थिक परिस्थिती नसतानादेखील पक्षाच्या आदेशानुसार नगरपालिकेची निवडणूक लढविली.
दरम्यान, संजय गांधी निराधार योजना समितीत संधी न मिळाल्यामुळे सागर कुराडे यांनी पदाचा राजीनामा दिला. परंतु, त्याची दखल घेतली गेली नाही. शिवसैनिकांच्या भावनेचा अनादर करून बाहेरील व्यक्तीची शहरप्रमुखपदी झालेली निवड चुकीची आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
पत्रकावर सागर कुराडे, अशोक शिंदे, मनीष हावळ, प्रकाश रावळ, राहुल खोत, सचिन प्रसादे, मंथन भडगावकर, तानाजी जाधव, अमर रणदिवे, काशीनाथ गडकरी, वसंत शेटके, रमेश कोरवी, संजय खोत, सचिन चव्हाण, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिक्रिया
गुणवत्ता पाहूनच निवड
गडहिंग्लज शहरातील शिवसैनिकांत कसलीही धुसफूस नाही. गुणवत्ता पाहूनच पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. त्या संदर्भात काहींची वेगळी भूमिका असेल तर ती वरिष्ठांच्या कानी घालू, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल.
- विजय देवणे, शिवसेना जिल्हाप्रमुख