शिरोळ : जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींपैकी ४७ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होत आहे. मतदानादिवशी मतदारांच्या डाव्याऐवजी उजव्या हाताच्या तर्जणीला (बोटाला) शाई लावण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या क्षेत्रामध्ये लोकसभा, विधानसभेची तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची अथवा अन्य निवडणूक नुकतीच पार पडलेली असेल व मतदान केलेल्या मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जणीवर शाईची निशाणी मिटलेली नसेल अशा ठिकाणच्या निवडणुकांमध्ये डाव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याची तरतूद केली जाते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जर मधल्या बोटाला देखील शाईची निशाणी असेल, तर कोणत्या बोटाला शाई लावण्यात यावी, याबाबत निवडणूक आयोगाने नियम केला आहे.
..........
लेखी सूचना द्याव्यात
जिल्ह्यामध्ये नुकतीच पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली आहे. या निवडणुकीत मतदार असलेल्या नागरिकांनी दोन्ही ठिकाणी मतदान केले असल्यामुळे या मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जणी व मधल्या बोटाला शाई लावली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उजव्या हाताच्या तर्जणी (बोटाला)ला शाई लावण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. निवडणूक प्रशिक्षणादिवशी मतदान केंद्राध्यक्ष, अधिकारी व कर्मचारी यांना लेखी सूचना द्याव्यात, असे सांगितले आहे.