कोल्हापूर : दौलतनगर येथील घरफोडी प्रकरणात गेल्या वीस वर्षापासून फरार असलेल्या कर्नाटकातील अट्टल घरफोड्यास बुधवारी पोलीसांनी अटक केली. संशयित किशोर शेरसिंग मच्छले (वय ४५, रा. बागेवाडी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, सध्या रा. मुधोळ, जि. बागलकोट) असे त्याचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, अविनाश वसंत जाधव यांचे दौलतनगर येथे विजय स्टोअर्स किराणा मालाचे दूकान होते. दि. ४ जुलै १९९७ रोजी रात्री संशयित किशोर मच्छले याने साथीदार ब्रम्हानंद विलास बागडी (रा. मोतीनगर, कोल्हापूर) याच्या मदतीने घरफोडी करुन मुद्देमाल लंपास केला होता.
बागडी हा पोलीसांना मिळून आला. परंतू मच्छले पसार झाला. त्याचा शोध घेतला असता मिळून येत नव्हता. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी रेकॉर्डवरील फरार आरोपींचा शोध घेवून प्रलंबित गुन्ह्यांचा निपटारा करण्याच्या सुचना क्राईम बैठकीत दिल्या होत्या.
त्यानुसार रेकॉर्डवरील फरारी गुन्हेगारांची माहिती व ठावठिकाणा शोधण्याचे काम सुरु असताना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांना मच्छले हा कर्नाटक राज्यातील रामदुर्ग (जि. बागलकोट) याठिकाणी असलेची माहिती मिळाली.
त्यानुसार कॉन्स्टेबल इकबाल महात, सुनिल कवळेकर, शिवाजी खोराटे, प्रल्हाद देसाई यांनी रामदुर्ग येथून त्याला ताब्यात घेतले. गेली वीस वर्ष तो पोलीसांना चकवा देत होता. या कालावधीत त्याने आणखी काही गुन्हे केले आहेत काय, याची माहिती पोलीस घेत आहेत.