कोल्हापूर : रमजान ईदच्या निमित्ताने कळंबा मध्यवर्ती कारागृहातील ३०० मुस्लिम कैद्यांनी गुरुवारी (दि. ११) कारागृहात सामुदायिक नमाज पठण केले. रोजे आणि नमाज पठण यासाठी कारागृह प्रशासनाने कारागृहात व्यवस्था केली होती. कैद्यांमधील धार्मिक, सामाजिक सलोखा वाढवून त्यांच्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी असे विविध उपक्रम सुरू असल्याची माहिती कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे यांनी दिली.
कळंबा मध्यवर्ती कारागृहात २३०० कैद्यांपैकी ३०० कैदी मुस्लिम आहेत. त्यांना रोजाचे उपवास करता यावेत, यासाठी पहाटे पाच वाजता आणि सायंकाळी सहा ते सात या वेळेत जेवणाची व्यवस्था केली होती. ईदच्या निमित्ताने गुरुवारी सकाळी सामुदायिक नमाज पठणचे आयोजन केले होते. यासाठी बाहेरून मौलवी तौसिफ होकेवाले, अब्दुल अजीज, जाफर मलबारी, युनुस शेख, दिलबारी बेपारी यांना पाचारण केले होते.
नमाज पठण झाल्यानंतर सर्वांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. कारागृहातील सर्वधर्मीय कैद्यांना त्यांच्या धार्मिक रीतीरिवाजानुसार उपासना करता यावी, यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. यातून कैद्यांमध्ये धार्मिक सलोखा वाढीस लागत असल्याचे कारागृह अधीक्षक शेडगे यांनी सांगितले.
यावेळी उपअधीक्षक सचिन चिकणे, वरिष्ठ तुुरुंग अधिकारी चंद्रशेखर देवकर, विलास कापडे, शैला वाघ, वामन निमजे यांच्यासह भारत पाटील, प्रवीण आंबेकर, अविनाश भोई, विठ्ठल शिंदे, मुनीफ शेख, माधुरी मोरे, सतीश माने, सुभेदार कोळी, आदी उपस्थित होते.