पोर्ले तर्फ ठाणे : श्रमदानाच्या माध्यमातून पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) बावाची डाग (गवती रान) येथील झऱ्यातील पाण्याची स्वच्छता व मोकळ्या जागेत वृक्षारोपण केले. तसेच घोणस व धामन जातीच्या सरपडणाऱ्या प्राण्यांना जीवदान देऊन जंगलात सुरक्षित जागी सोडण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने निसर्ग मित्रांनी असा आगळावेगळा उपक्रम राबवून वन्यजीव सप्ताहाची सांगता केली.गतवर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून निसर्गमित्र दिनकर चौगुले यांच्या पुढाकाराने ५0 वर्षांपूर्वीचे मृतावस्थेत असणाऱ्या झऱ्यांना जिवंत केले होते. झऱ्यातील पाण्याचा स्त्रोत सुरू झाल्याने परिसरातील वन्यप्राण्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला होता. झऱ्याच्या क मकुवत कडा ढासळल्या होत्या, तर आजूबाजूला पाला पाचोळ्यांमुळे पाणी अस्वच्छ झाले होते. येथील कन्या विद्यामंदिरच्या विद्यार्थिंनी, न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, न्यू कॉलेज, इको क्लबचे विद्यार्थी, पन्हाळा वनक्षेत्राचे कर्मचारी, आदींच्या श्रमदानातून झरे स्वच्छ केले.दरम्यान, तळिमाळ नावाच्या डोंगरात विविध जातींचे वृक्षारोपण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निसर्गमित्र अनिल चौगुले यांनी उपस्थितांना वन्यप्राणी व निसर्गातील जैवविविधतेविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी पन्हाळा परिक्षेत्रातील अधिकारी विजय दाते, आर. एस. रसाळ, ईश्वरा जाधव, यशवंत पाटील, तानाजी लव्हटे, शिक्षक प्रकाश ठाणेकर, निशिकांत चोपडे, सरदार चौगुले, आदींसह शाळेतील विद्यार्थी विद्यार्र्थिनी निसर्गमित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. विवेक चौगुले यांनी आभार मानले. (वार्ताहर)गाववस्तीत वावरणाऱ्या वन्यप्राण्यांना न मारता त्यांना जीवदान देऊन जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडले, तरच नैसर्गिक समतोल राखला जाईल. बालवयात जैवविविधता व वन्यप्राण्यांविषयी मुलांच्यात नैसर्गिक ओढ निर्माण व्हावी. या उदात्त हेतूने माझ्या प्रत्येक नैसर्गिक उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सहभाग अग्रणी असतो.-निसर्गमित्र दिनकर चौगुले, पोर्ले तर्फ ठाणे
निसर्गमित्रांचा आगळावेगळा उपक्रम
By admin | Published: October 09, 2015 9:58 PM