इचलकरंजी : केंद्र आणि राज्यात एकच सरकार आहे. त्यांनी ईडीमार्फत माझी चौकशी करावी आणि माझ्याकडे असलेल्या जमिनीचा शोध घ्यावा, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिले. शेट्टींनी शहरातील काही कुटुंबांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.शेट्टी म्हणाले, माझ्याकडे २०० एकर जमीन असल्याची पोस्ट ज्यांनी व्हायरल केली, त्यांची राज्यात आणि केंद्रात सत्ता आहे. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स तसेच आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग यांसारख्या संस्था त्यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडून माझी चौकशी करावी. जनतेला आणि मला पण कळेल की, माझ्याकडे किती जमीन आहे.इचलकरंजी पाणी योजनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘अंधा कानून’ चित्रपटाप्रमाणे न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मी भोगत आहे. मला पाच वर्षांचा वनवास सहन करावा लागला, हे इचलकरंजीकरांच्या लक्षात आले आहे. त्याबद्दल माझी कोणाकडे तक्रारही नाही. मात्र, मी कामाचा माणूस आहे. शहरातील पाण्याचा प्रश्न मी सोडवू शकतो. मी ज्या चळवळी केल्या, त्याचा सक्सेस रेटही चांगला आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथील आंदोलनादरम्यान व्यासपीठावर जाऊन पाण्याला विरोध करू नका म्हणून सांगणारा मी नेता आहे. शेतकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही, याचीही ग्वाही मी दिली होती. मात्र, कटकारस्थान करून काही मंडळींनी मुद्दामहून मला यात अडकवले. ज्यांनी कट केला, आज तुमचा यामध्ये संबंध नाही, असे मला सांगत आहेत. इचलकरंजीचे पाणी राजकारणात अडकले आहे. रस्त्यावरची लढाई करून हे पाणी आणावे लागेल आणि ती लढाई करण्याची धमक आणि ताकद माझ्यात आहे. शहराला टफ् योजनेच्या माध्यमातून ४६० कोटी रुपये आणून दिले. यापूर्वी आणि आताच्या खासदारांना ते जमले नाही. भविष्यात वीजसवलत, व्याज अनुदान हे प्रश्न सोडविणार आहे. यंत्रमागधारकांना नाबार्डसारख्या योजनेतून कमी व्याज दराने कर्जपुरवठा करण्यासाठी सरकारमार्फत यंत्रणा उभी करण्यासाठी पाठपुरावा करीन.‘मशाल’ का घेतली नाही?‘मशाल घेणे’ याचा अर्थ एबी फॉर्म घेणे आणि ते घेण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करावा लागला असता. शेतकऱ्यांनी ३० वर्षे मला तळहाताच्या फोडासारखे जपले आहे. माझ्या स्वार्थासाठी त्यांना आणि चळवळीला वाऱ्यावर सोडणे शक्य नव्हते. त्यामुळे मी मशाल हाती घेतली नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
Hatkanangle LokSabha Constituency: माझी ईडीमार्फत चौकशी करा; 'ती' पोस्ट व्हायरल होताच राजू शेट्टींनी दिले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 1:16 PM