कोल्हापूर : पनवेलमधील सनातन संस्थेच्या आश्रमात सापडलेल्या नार्कोटिक औषधांप्रकरणी दोघांकडे चौकशी सुरू केली असून, ही औषधे कशाची आहेत, याचाही सखोल तपास केला जाणार आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे हत्येतील संशयित व सनातन संस्थेचा पूर्णवेळ साधक असलेलल्या डॉ. वीरेंद्र तावडेच्या मोटारसायकलबाबतचा शोध सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून शुक्रवारी सांगण्यात आले.पानसरे हत्येप्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडेला न्यायालयाने शुक्रवारी (दि. १६) पर्यंत पोलिस कोठडी दिली. दरम्यान, मागील पाच दिवसांच्या पोलिस कोठडीत पोलिसांनी पनवेल येथील सनातन संस्थेच्या आश्रमावर व तावडेच्या घरावर छापा टाकला. त्यामध्ये आश्रमामधून नार्कोटिक औषधे मिळाली आहेत. यासाठी रायगडच्या अन्न व औषध प्रशासनाला या औषधांबाबतचा अहवाल देण्यास सांगितले आहे. त्यामुळे अन्न व औषधचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर ही औषधे कशासाठी वापरली आहेत, याचा उलगडा होईल. तरीही, पोलिस या औषधांचा वापर कशासाठी झाला आहे का?, या गुन्ह्यात त्यांचा वापर झाला आहे का? याचा शोध पोलिस घेणार आहेत. या प्रकरणी पनवेल येथून दोघांना चौकशीसाठी कोल्हापुरात आणले आहे. त्यांच्याकडे या औषधांबाबत चौकशी सुरू केली आहे. तसेच तावडे हा मोटारसायकलीबाबत खोटे बोलत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिस त्याच्या मोटारसायकलीचा शोध घेणार आहेत.दरम्यान, पानसरे हत्याप्रकरणात पोलिसांना संशय आहे, त्या ठिकाणी जाऊन तपास करण्यात येणार आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे तावडेच्या पोलिस कोठडीच्या कालावधीत ते गोवा, बेळगाव, वाशिम, यवतमाळ येथे जाऊन त्या दृष्टीनेही तपास करणार आहेत.
पनवेलमधील दोघांकडे चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2016 1:08 AM