कोल्हापूर : रुईकर कॉलनी, दत्तमंदिर येथील श्रीरंग अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये सराईत गुंड व नातू स्वप्निल तहसीलदार याला क्रिकेट बेटिंग घेण्यास संमती दिल्याप्रकरणी काँग्रेसच्या नगरसेविका सुरेखा प्रेमचंद शहा यांना आज, बुधवारी शाहूपुरी पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविले आहे. या बेटिंग प्रकरणात आरंजन बाबूराव शेठ (रा. नागाळा पार्क) याच्यासह गांधीनगर व सांगली येथील शेट्टी नावाच्या तीन बुकीमालकांची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यांच्या घरी पोलिसांनी छापे टाकले असता ते कुटुंबासह फरार झाले. लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळणार असल्याचे पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. रुईकर कॉलनी, दत्तमंदिर येथील श्रीरंग अपार्टमेंटमधील नगरसेविका सुरेखा शहा यांच्या फ्लॅटमध्ये सराईत गुंड स्वप्निल तहसीलदार दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असल्याची माहिती ‘शाहूपुरी’चे निरीक्षक चौधरी यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांसमवेत सोमवारी (दि. २८) रात्री छापा टाकला असता जवाहर चंदवाणी, गोपी आहुजा, कन्हैया कटीयार हे तिघे पंटर मिळून आले. पोलिसांची चाहूल लागताच गुंड तहसीलदार तेथून फरार झाला. पंटरांकडून ताब्यात घेतलेल्या लॅपटॉप, मोबाईलवरून बेटिंगचे कनेक्शन बंगलोर, मुंबईपर्यंत असल्याचे निष्पन्न झाले. पंटरांकडे केलेल्या चौकशीमध्ये कोल्हापुरातील आरंजन शेठ व गांधीनगर, इचलकरंजी येथील शेट्टी नावाच्या बुकीमालकांच्या सांगण्यावरून बेटिंग घेत असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या बुकीमालकांच्या घरी छापे टाकले असता दोघेही कुटुंबासह फरार झाल्याचे दिसून आले. दरम्यान, नगरसेविका सुरेखा शहा यांनी फ्लॅटमध्ये स्वत:चे संपर्क कार्यालय दाखविले आहे. त्यामध्ये नातू व सराईत गुंड स्वप्निल तहसीलदार याला क्रिकेट बेटिंग घेण्यास संमती दिल्याप्रकरणी त्यांनाही चौकशीसाठी आज, बुधवारी शाहूपुरी पोलिस ठाण्यात हजर राहण्यास समन्स काढले आहे. गुंड तहसीलदार हा खुनी हल्ल्याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात आहे. तेथून तो बाहेर पडल्यानंतर त्याला ताब्यात घेणार असल्याचे निरीक्षक चौधरी यांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक विद्या जाधव करीत आहेत. (प्रतिनिधी)
नगरसेविका सुरेखा शहा यांच्याकडे आज चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2016 11:46 PM