कोल्हापूर : जिल्ह्यातील हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत चार प्रमुख रस्त्यांच्या ६७५ कोटी रुपयांच्या कामाची राज्यस्तरीय दक्षता व गुणवत्ता नियंत्रण महामंडळ, नाशिक यांच्या वतीने चौकशी करण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी दिले. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या मागणीनुसार हे आदेश देण्यात आले आहेत.
माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या काळात मंजूर झालेली ही कामे असून मुश्रीफ यांच्या विनंतीवरून मुंबईत मंत्र्यांनी ही बैठक घेतली. राज्यातील चौकशीआधी पाटील यांच्याच जिल्ह्याची पहिल्यांदा चौकशी लावण्यात आली आहे.राज्यात युती शासनाच्या काळात रस्ते विकासाकाकरिता पथदर्शी प्रकल्प म्हणुन हायब्रिड ॲन्युटी अंतर्गत योजना रावविण्यात आली. राज्यात यातून सुमारे तीन हजार कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. दोनच दिवसांपूर्वी निपाणी-दाजीपूर रस्त्याचे काम किती निकृष्ट झाले आहे याचे वृत्त ह्य लोकमतह्णने प्रसिद्ध केले आहे. ठेकेदार जितेंद्रसिंह कुणालाच अजिबातच जुमानत नसल्याच्या तक्रारी आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोल्हापूर जिल्ह्यात संथगतीने कामे सुरू असून कामांचा दर्जाही निकृष्ट असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.
आमदार आबिटकर म्हणाले की, ठेकेदारांना पोसण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत एक किमी रस्त्याकरिता ५० लक्ष रुपयांमध्ये चांगल्या पद्धतीने काम होते; पण हायब्रिड ॲन्युटीअंतर्गत रस्तेकामास प्रति किलोमीटर तीन कोटी रुपये खर्च करूनही रस्त्यांचा दर्जा चांगला नाही.हसन मुश्रीफ म्हणाले , राज्यामध्ये हायब्रिड ॲन्युटीअंतर्गत सुरू असणाऱ्या रस्ते कामांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून सुरुवातीपासूनच ही योजना वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारीही सामील आहेत. या सर्व बाबींची चौकशी होण्याची गरज आहे. मुश्रीफ आणि आबिटकर यांच्या तक्रारी ऐकल्यानंतर या विभागाचे सचिव देबडवार यांना चव्हाण यांनी चौकशीचे आदेश दिले. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, अधीक्षक अभियंता संभाजी माने, कार्यकारी अभियंता तुषार बुरुड, कक्ष अधिकारी श्रीमती गजभिये, अश्विन सावंत, विजय बलुगडे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.ही आहेत कामे...१.कोल्हापूर-परिते-गारगोटी-गडहिंग्लज रस्ता - २२१.९७ कोटी रुपये२. राधानगरी तालुक्यातील देवगड जिल्हा हद्द ते दाजीपूर राधानगरी मुदाळतिठ्ठा निपाणी - २२४.०१ कोटी रुपये३. भुदरगड तालुक्यातील मठकुडाळ शिवडाव कडगाव गारगोटी रस्ता - ११६ कोटी ११ लाख रुपये कोटी४. विटा, पेठ, मलकापूर, अणुस्कुरा, सातवली, पावस - १११ कोटी ६० लाख रुपये