कोल्हापूर : उद्यान विभागामार्फत नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून होणाऱ्या वृक्षतोडीची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिले. शहर कृती समितीच्यावतीने ठेकेदाराकडून महापालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आली आहे.उद्यान विभागाच्यावतीने शहरातील धोकादायक वृक्ष तोडण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. याकामासाठी ठेकेदाराकडून महापालिकेची यंत्रणेचा वापर केला जातो आहे तसेच जादा दराने वृक्षतोड करत आहे. या कारणामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचीही मिलिभगत असण्याची शक्यता आहे.
संबंधित प्रकरणाची चौकशी व्हावी आणि कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी मागील महिन्यामध्ये शहर कृती समितीचे रमेश मोरे, अशोक पोवार यांनी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली होती. त्यांनी काही पुरावेही सादर केले होते.
इतर शहरांतील तोडणीचे दर आणि महापालिका देत असलेल्या दरांमध्ये प्रचंड तफावत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणली होती. त्याची गंभीर दखल आयुक्तांनी घेत त्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, वरिष्ठ लेखापरीक्षक दीपक कुंभार यांना दिले.
यामध्ये त्यांनी ठेकेदारासोबत झालेला करार, निविदेतील अटी, शर्ती यांची कागदपत्रांची तपासणी करणे, यामध्ये कोणतीही अनियमितता आहे का याची चौकशी करणे आणि पंधरा दिवसांत या सर्व प्रकरणाचा अहवाल द्यावा असेही म्हटले आहे.