कोल्हापूर : शाळेत येण्याबाबत कोणत्याही सूचना नसताना, काही माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांना शाळेत बोलावून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. शहरासह ग्रामीण भागांमध्येही असे काही प्रकार सुरू असून, याची दखल माध्यमिक शिक्षण विभागाने घेतली आहे.गेले पाच महिने सर्व शाळा बंद असून माध्यमिक शिक्षक हे घरातून ऑनलाईन अध्यापन करीत आहेत. संबंधित शिक्षकांना त्यांचे वेळापत्रक, विषयवाटप करण्यात येते आणि संबंधित विद्यार्थ्यांचे ग्रुप तयार करण्यात आले आहेत. तसेच ऑनलाईन पद्धतीने अध्यापन करून पेपरही सोडविण्यासाठी देण्यात येत आहेत.एकीकडे अशा पद्धतीने घरातून ऑनलाईन अध्यापन सुरू असतानाच काही शाळा मात्र ५० टक्के शिक्षकांची उपस्थिती ठेवण्यासाठी आग्रही असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक शिक्षकांसाठी शाळेत कोणतेही काम नसताना आदल्या दिवशी मेसेज टाकून दुसऱ्या दिवशी संबंधित शिक्षकांना शाळांमध्ये येणे बंधनकारक करण्यात येत आहे.एकीकडे सप्टेंबरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होणार असल्याचे मंत्री उघडपणे सांगत असताना, दुसरीकडे अशा पद्धतीने परगावच्याही शिक्षकांना शाळेत बोलावून घेतले जात आहे. जिल्ह्यात अनेक संस्थांच्या शाळा बंद असताना ठरावीक शाळांमध्ये शिक्षकांना का बोलावले जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अशा पद्धतीने शिक्षकांना शाळेत बोलावण्याबाबत कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत. एकीकडे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाचे सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू असताना, शाळा महिनाअखेरपर्यंत बंद राहणार असताना, अशा पद्धतीने शाळेत शिक्षकांना बोलावणे चुकीचे आहे.- किरण लोहारमाध्यमिक शिक्षणाधिकारी