राजाराम पाटील - इचलकरंजी -नगरपालिकेतील कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करीत शहर विकास आघाडी नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांना पाठिंबा देण्याचा फेरविचार करीत आहे. असे सांगितल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेसच्या विशेष बैठकीस तिघे वगळता २६ जणांनी उपस्थिती दाखविल्याने काँग्रेसजनांची एकजूट असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे ‘शविआ’ आता लटकत राहिल्याने पालिकेच्या राजकीय गोटात अस्वस्थता पसरली आहे. काँग्रेसच्या नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांनी पक्षांतर्गत निर्णयाप्रमाणे राजीनामा दिला नाही. त्यांच्या या बंडास ‘शविआ’ व राष्ट्रवादीतील कारंडे गटाने पाठिंबा दिला. आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या सत्तेत राहून प्रभागातील विकासकामे व नागरी सेवा-सुविधा पुरविल्याने ‘शविआ’ची प्रतिमा चांगली होऊन या कामांच्या जोरावर निवडणुकांना सामोरे जाता येईल, असा हेतू ‘शविआ’ने ठेवला.इकडे राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादीतील जांभळे गटानेही नगराध्यक्षांना सहकार्य करण्याची भूमिका जाहीर केली. मात्र, पाच महिन्यांनंतर ‘शविआ’च्या बहुतांश नगरसेवकांची कामे होत नाहीत म्हणून नाराजी पसरली. पक्षप्रतोद अजित जाधव, अध्यक्ष जयवंत लायकर, निमंत्रक तानाजी पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नगरसेवक-नगरसेविकांनी नाराजी व्यक्त केली. त्यावेळी नगराध्यक्षा बिरंजे यांना पाठिंबा देण्याबाबत फेरविचार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ५ जूननंतर परगावाहून परतणारे आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी चर्चा झाल्यावर अंतिम निर्णय घेण्याचे ठरले. आता आमदार सुरेश हाळवणकर अद्यापही परतले नसल्याने ‘शविआ’च्या गोटात अस्वस्थता वाढू लागली आहे. अशा पार्श्वभूमीवर शुक्रवारी काँग्रेस समितीमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक झाली. बैठकीस नगराध्यक्षा बिरंजे, नगरसेवक संजय तेलनाडे व चंद्रकांत शेळके हे तिघे अनुपस्थितीत राहिले. उर्वरित २६ जणांनी बैठकीस उपस्थिती दाखविली.मात्र, या बैठकीस माजी मंत्री प्रकाश आवाडे आले नाहीत. त्यामुळे बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. बैठकीस २९ पैकी २६ नगरसेवक-नगरसेविका उपस्थित राहिल्याने काँग्रेसची एकजूट दिसून आली. राष्ट्रवादीच्या भूमिकेची उत्सुकतानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ११ नगरसेवक असून, त्यापैकी कारंडे गटाचे चार व जांभळे गटाचे सात नगरसेवक असे बलाबल आहे. दोन्ही गटांत कमालीचा वाद आहे. कोणत्याही प्रश्नावर समन्वयाची भूमिका नसल्याने नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची कोणती दिशा असणार, याचेच औत्सुक्य आहे.
नगराध्यक्षप्रश्नी ‘शविआ’मध्ये अस्वस्थता
By admin | Published: June 08, 2015 12:12 AM