आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २0 : अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित दर्शन मंडप, बाबूजमाल दर्गासमोरील, बिंदू चौक परिसरातील व लक्ष्मीपुरी परिसरातील गाडी अड्डा येथील बहुमजली पार्किंगची शुक्रवारी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पाहणी करून माहिती घेतली.
सकाळी नऊच्या सुमारास विभागीय आयुक्त दळवी यांनी अंबाबाई मंदिरात येऊन दर्शन घेतले. यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, अंबाबाईची मूर्ती देऊन चंद्रकांत दळवी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर हसिना फरास, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, समितीचे सचिव विजय पोवार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आदी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्तांनी अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर व परिसराची पाहणी केली. यामध्ये फरास खाना परिसरातील प्रस्तावित दर्शन मंडपाच्या जागेची पाहणी केली. यानंतर अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी बाबूजमाल दर्ग्यासमोरील प्रस्तावित बहुमजली पार्किंगच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर बिंदू चौक परिसरातील ही बहुमजली पार्किंगच्या जागेची व लक्ष्मीपुरी येथील गाडी अड्डा येथील पार्किंगच्या जागेची पाहणी करून त्यांनी यासंदर्भात माहिती घेतली.