लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन होते की नाही, याबाबत विविध दहा पथकांद्वारे रविवारपासून शहरातील उद्योग-व्यवसायांची प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली जाणार आहे.
राज्य शासनाने नवीन निर्बंध लागू केले असून, त्यानुसारच उद्योग-व्यवसाय सुरु करता येणार आहे. त्या संदर्भात जिल्हाधिकार्यांनी पथकांची नियुक्ती केली आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळ, कोल्हापूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड, क्षेत्रीय अधिकारी सचिन हरबड, एमआयडीसी सहाय्यक अभियंता सुनील अपराज यांनी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनमध्ये शहरातील सायझिंग, प्रोसेस, यंत्रमागधारक संघटना, इंजिनिअरिंग असोसिएशनचे पदाधिकारी यांची बैठक घेतली. त्यामध्ये अधिकार्यांनी शहर व परिसरातील उत्पादन घटकांची तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले. अत्यावश्यक सेवा, निर्यात, निरंतर प्रक्रिया व निवासाची व्यवस्था अशा प्रकारातील उत्पादन घटकांना लॉकडाऊन काळात उद्योग-व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय अन्य उद्योग बंद राहणार आहेत. ज्याठिकाणी शासन निर्बंधांचे पालन होत नाही, अशा उद्योगांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी, दत्तात्रय कनोजे, प्रकाश गौड, सुभाष बलवान, सागर चाळके, पुंडलिक जाधव आदींसह औद्यागिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.