कोल्हापूर : प्रसिध्द अभिनेते आणि नाम फौंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांनी मजले जलमित्र फौंडेशनने केलेल्या जलसंधारण कामाची पाहणी केली. यावेळी नव्याने आलेल्या पाण्याचे पूजन नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाम फौंडेशनचे कार्यकारी अधिकारी गणेश थोरात, मजले गावचे सुपुत्र पर्यावरण प्रेमी शांतीनाथ पाटील यांच्यासह जलमित्र फौंडेशनचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी नाना पाटेकर म्हणाले, जलसंधारणाच्या कामामुळे पाण्याचा प्रश्न निश्चित सुटेल गावकऱ्यांना केलेल्या कामाचे निश्चित यश मिळेल. या कामासाठी लागेल ते सहकार्य नाम फौंडेशनच्या वतीने करण्याचे आश्वासन नाना पाटेकर यांनी केले.
गेल्या दोन वर्षापासून नाम फौंडेशनने यांत्रिक मशिन देवुन सहकार्य केल्यामुळे तीन तलावातील गाळ काढण्यात आला. यामुळे चार कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाली आहे. याशिवाय डीप सीसीटी लूज बोल्डर ही कामेही झाली.
यावेळी नाना पाटेकर यांनी कामाचे कौतुक केले. नाम फौंडेशनचे कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांना नाम फौंडेशनच्या कामाबद्दल मानपत्र देण्यात आले. यावेळी सरपंच, ग्रामस्थ व जलमित्र उपस्थित होते. यावेळी महामानवांच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले. मजले ग्रामस्थ, जलमित्र फौंडेशनच्या कार्यकर्त्यानी कार्यक्रमाचे आयोजन केले.