पन्हाळा : ऐतिहासिक पन्हाळगडावरील बुरुज ढासळल्याच्या घटना काही दिवसापुर्वीच समोर आल्या आहेत. यानंतर दुर्गप्रेमींनी याप्रश्नी आवाज उठवला होता. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पुरातत्व विभागाला पत्र लिहून याप्रश्नी लक्ष देण्याची विनंती केली होती. यानंतर आज, बुधवारी आर्किटेक्ट अँन्ड इंजिनियर असोसिएशन, जिओलॉजिस्ट, नगरपरिषद, पुरातत्व विभाग, सार्वजनिक बांधकाम यांच्यावतीने पन्हाळा नाका ते पुसाटी बुरुज मार्गे, सज्जाकोठी पर्यंत ऐतिहासिक वास्तुंची आणि तटबंदीची पाहणी करण्यात आली. असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणेंनी सांगितले की, पन्हाळ्यातील ऐतिहासिक वास्तू व तटबंदीची पडझड रोखण्यासाठीचा अहवाल येत्या गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहोत. या ऐतिहासिक वास्तुंचे नेमके कोणत्या पद्धतीने संरक्षण करता येइल याला प्राधान्य देणार आहे व त्यासाठी नेमके काय करावे लागेल याची बैठकीत चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.संपुर्ण आराखडा बनवून असोसिएशन नगरपरिषदेकडे व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करुन पुरातत्व खात्याची परवानगी घेवुन पुढील कामकाज केले जाणार असल्याचे जिओलॉजिस्ट बाबा जगताप यांनी सांगितले.ऐतिहासिक वास्तू पाहणीसाठी संवर्धन तज्ञ चेतन रायकर, जिओलाॕजिस्ट बाबा जगताप, डॉ. नवघरे, जे. डी. पाटील, श्रीकांत शिंदे, पुरातत्व चे विजय चव्हाण, आर्किटेक्ट असोसिएशनचे अजय कोराणे, प्रशांत हाडकर, अंजली जाधव, सार्वजनिक बांधकामचे धनंजय भोसले, काटकर हे सर्व अभियंते हजर होते. तर माजी नगराध्यक्ष असीफ मोकाशी, माजी उपनगराध्यक्ष रविंद्र धडेल, चंद्रकांत गवंडी हे हजर होते.
पन्हाळगडावरील पडझडीची तज्ञ अभियंत्यांकडून पाहणी, जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने अहवाल देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2022 6:41 PM