कोल्हापूर : राजारामपुरी येथील चौथ्या व पाचव्या गल्लीत कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे तेथील प्रतिबंधित क्षेत्रास प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी वैद्यकीय पथकासमवेत भेट देऊन पाहणी केली. त्यांनी शिवाजी विद्यापीठातील ‘डीओटी’ कोविड केअर सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांची माहिती घेतली.
राजारामपुरीतील प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधून सर्दी, खोकला तापाची काही लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले. प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. बाधितांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:हून पुढे यावे, जेणेकरून पुढचे धोके आपल्याला टाळता येतील. आरोग्य विभागामार्फत दैनंदिन होणाऱ्या सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सर्वेक्षणात तापाची लक्षणे आढळल्यास त्या सर्वांचा स्वॅब घेण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. कोरोनाबाबत सर्वांनी दक्षता घ्यावी, मास्कचा वापर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी सहायक आयुक्त संदीप घार्गे, उपशहर अभियंता बाबूराव दबडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शोभा दाभाडे, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, समन्वय अधिकारी तानाजी गेजगे, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडील कर्मचारी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १५०४२०२१-कोल-केएमसी०१
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी गुरुवारी राजारामपुरीतील प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांशी संवाद साधला.