कोल्हापूर : धुळे येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुतळा व स्मारक उभे करण्याचे निश्चित झाले असून, स्मारक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांनी रविवारी कोल्हापुरातील दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याची पाहणी केली. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली हा पुतळा उभारला जात आहे.
धुळे येथील पारोळा रस्त्यावरील शाहू नाट्यगृहाच्या परिसरात हा पुतळा लोकवर्गणीतून उभा केला जाणार आहे. एकाच दिवसात पाच लाख रुपयांचा निधी जमा झाला आहे. या पुतळ्याबरोबरच म्युझियमदेखील तयार केले जाणार आहे. शाहू महाराजांचे विचार जोपासावेत यासाठी एक उत्तम लायब्ररी उभी केली जाणार आहे. सुमारे १२ फूट उंचीचा हा पूर्णाकृती पुतळा असेल. पुतळ्याच्या परिसरात शाहूंच्या कार्यावर आधारित शिल्पे असतील.
पुतळा समितीने रविवारी दसरा चौक येथील राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा, नर्सरी बागेतील स्मारक समाधिस्थळ, जुना राजवाडा, कागल येथील शाहू साखर कारखाना कार्यस्थळावरील शाहू महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी केली.
माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वाखाली उभारला जात असलेला हा नियोजित पुतळा २६ जून २०२२ रोजी शाहू जयंतीदिनी उभारण्याचा समितीचा मानस आहे. निधीची उपलब्धता लोकवर्गणीतूनच केली जाणार आहे आणि धुळे जनतेच्या वतीने निधी उत्स्फूर्तपणे गोळा होत आहे.
यावेळी प्रकाश पाटील, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष निंबा मराठे, साहेबराव देसाई, नगरसेवक शीतलभाऊ नवले, संदीप पाटोळे, मुन्ना शितोळे, विनोद जगताप, शिल्पकार सरमद पाटील, कोल्हापूरचे माजी नगरसेवक तौफिक मुलाणी, भवानीसिंह घोरपडे उपस्थित होते.