कोल्हापूर : मासुर्ली (ता. खटाव, जि. सातारा) येथील पुतण्याने हडप केलेली जमीन व घर परत मिळावे, या आशेपोटी वृद्धेने बुधवारी दिवसभर विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात ठिय्या मांडला. दिवसभर उपाशीपोटी बसलेल्या या वृद्धेची अखेर विश्वास नांगरे-पाटील यांची भेट झाली नाही. रात्री उशिरा नांगरे-पाटील यांच्या सहायकाने ‘त्या’ वृद्धेची भेट घेऊन निवेदन ठेवून घेतले.
अधिक माहिती अशी, सोनाबाई जयसिंग माने (वय ८०) यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांना तीन विवाहित मुली आहेत. त्या मासुर्ली येथे एकट्याच राहतात. दोन महिन्यांपूर्वी पुतण्या सर्जेराव निवृत्ती माने याने त्यांची जमीन व घर हडप केले आहे. त्यांना घरातून हाकलून दिले. निवारा नाही की कोणाचा आधार नाही, या मानसिकतेत खचलेल्या सोनाबाई यांनी आठवड्यापूर्वी कोल्हापुरात नांगरे-पाटील यांची भेट घेतली. त्यांनी स्थावर मालमत्तेची कागदपत्रे घेऊन भेटण्यास सांगितले. त्यानुसार बुधवारी दुपारी एकच्या सुमारास त्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात आल्या. या ठिकाणी त्यांनी नांगरे-पाटील यांना भेटण्यासाठी आल्याचे पोलिसांना सांगितले. पण पोलिसांनी साहेब बैठकीमध्ये असल्याचे सांगून वृद्धेकडे दुर्लक्ष केले.
सोनाबाई कार्यालयाबाहेर दिवसभर नांगरे-पाटील यांची भेट घेण्यासाठी बसून राहिल्या. दिवसभरात परिक्षेत्रातील पोलीस अधिकाºयांच्या तीन बैठका झाल्याने कोणालाच नांगरे-पाटील यांना भेटता आले नाही. सायंकाळी सहाच्या सुमारास नांगरे-पाटील निघून गेले.अॅड. चारूलता चव्हाण यांची माणुसकी...कार्यालयातील कर्मचारी घरी जात असताना त्यांना सोनाबाई कार्यालयाबाहेर बसल्याचे दिसले. या प्रकाराची माहिती अॅड. चारूलता चव्हाण यांना समजली. त्यांनी तत्काळ महानिरीक्षक कार्यालयाबाहेर येऊन सोनाबार्इंची भेट घेतली. त्यानंतर अधिकाºयांशी फोनवर संपर्क साधून विचारपूस केली. काही वेळाने नांगरे-पाटील यांच्या सहायकांनी सोनाबार्इंची भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्याकडील निवेदन व काही कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतीही घेतल्या. त्या दिवसभर उपाशी असल्याने त्यांना पाणी, वडापाव व चहाही दिला. आपणाला नांगरे-पाटील यांना भेटूनच जायचे असल्याचे त्यांनी सहायकास सांगितले. त्यानुसार आज, गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास त्यांची भेट करून देण्याचे सहायकाने मान्य केले.