कोल्हापूर : महाशिवरात्रीनिमित्त सुट्टी असतानाही या सुट्टीचा सदुपयोग करत, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सोमवारी रंकाळा तलावाची पाहणी केली. विशेष म्हणजे सोबत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन त्यांनी रंकाळा तलावाची सहा किलोमीटरची पायपीट केली.
धुण्याच्या चावीपासून सुरुवात केलेली ही पाहणी मोहीम त्यांनी शाम हौसिंग सोसायटीजवळ थांबविली. रंकाळा तलावाचे होणारे प्रदूषण, वृक्षलागवडीचा कार्यक्रम या अनुषंगाने त्यांनी माहिती करून घेतली.रविवारी साप्ताहिक सुट्टी असतानाही आयुक्त कलशेट्टी यांनी थेट पाईपलाईन योजनेची कोल्हापूरपासून ते काळम्मावाडीपर्यंत पाहणी केली. त्यानंतर सोमवारच्या सुट्टीचा सदुपयोग करत त्यांनी रंकाळा तलाव पाहणी मोहीम पूर्ण केली.
त्यांच्यासोबत शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे असे वरिष्ठ अधिकारी, पर्यावरणवादी कार्यकर्ते उदय गायकवाड, कन्सल्टंट अंजली सुरत असोसिएटचे प्रतिनिधी होते. अंबाई जलतरण तलावापासून स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनीही पाहणी मोहिमेत भाग घेतला.कलशेट्टी यांनी प्रथम धुण्याची चावी, दुधाळी मैदान, पॅव्हेलियन येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्र यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रंकाळा टॉवर पासून रंकाळा उद्यान, रंकाळा चौपाटी, बोटिंग क्लब, पदपथ उद्यान, अंबाई जलतरण तलाव, रंकाळा खण, पक्षीतीर्थ, इराणी खण, शाम हौसिंग सोसायटी नाला अशा परिसराची पाहणी केली.
या पाहणीवेळी सांडपाण्यापासून होणारे प्रदूषण रोखण्याकरिता केलेल्या कामांची माहिती अधिकाऱ्यांनी कलशेट्टी यांना दिली. रंकाळा सुशोभीकरणासंदर्भात तयार करण्यात आलेल्या डीपीआरची माहिती सुरत जाधव यांनी दिली.
हा डीपीआर कोणत्या स्तरावर आहे, अशी विचारणा कलशेट्टी यांनी केली. तेव्हा आॅडिट विभागाकडे प्रलंबित असल्याची माहिती त्यांना देण्यात आली. त्यावेळी मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांना मंगळवारी माझ्याकडे डीपीआर घेऊन यायला निरोप द्या, अशी सूचना कलशेट्टी यांनी केली.
रंकाळा सुशोभीकरणाचे सरकारकडे द्यारंकाळा सुशोभीकरणाचे डीपीआर तयार झाले आहेत; मात्र ते काही कारणांमुळे मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे यांच्या टेबलवर प्रलंबित असल्याची माहिती सांगताच आयुक्त कलशेट्टी यांनी जो काही डीपीआर तयार आहे, तो निधी मागणीच्या प्रस्तावासाठी तातडीने राज्य सरकारकडे पाठवावा, अशी सूचना त्यांनी केली.
वृक्षलागवड शासकीय निकषाप्रमाणे‘लोकमत’च्या सोमवारच्या अंकात रंकाळा तलावातील जैवविविधता धोक्यात येत असल्याबद्दल छापून आलेल्या माहितीच्या अनुषंगाने आयुक्त कलशेट्टी यांनी माहिती घेतली. तसेच प्रत्यक्ष पक्षीतीर्थ येथे जाऊन त्यांनी पाहणी केली. पक्षीतीर्थ ते इराणी खण दरम्यान राज्य सरकारच्या निकषाप्रमाणे सुमारे पाच हजार वृक्ष लावण्यात येत असून, त्यातील साडेतीन हजार वृक्ष लावले आहेत.
उर्वरित वृक्ष लावले जात आहेत. तेथील वृक्षांना ठिबक सिंचनद्वारे पाणी दिले जात आहे. सरकारने या कामावर देखरेख करण्याकरिता कन्सल्टंट नेमले असून, शासकीय निकष आणि कन्सल्टंटच्या मार्गदर्शनानुसार येथे वृक्षलागवड केली असल्याचे शहर अभियंता सरनोबत यांनी सांगितले. जैवविविधता टिकविण्याकरिता घनदाट हरित वने तयार केली जात असून, तेथे कसल्याही प्रकारचा कॉँक्रीटचा रस्ता अथवा पदपथ करण्याचे नियोजन नसल्याचे सरनोबत यांनी स्पष्ट केले.