लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘डॉल्बीमुक्तीतून जलयुक्त शिवाराकडे’ हा गतवर्षी गणेशोत्सवात पोलिसांनी केलेला संकल्प अखेर पूर्णत्वास गेला आहे. गणेशोत्सव मंडळांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘डॉल्बी’साठी खर्च होणारे पैसे ‘जलयुक्त शिवारा’ला दिल्याने, जिल्ह्यात दोन सिमेंट बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या आयुष्यातील दुष्काळ हटविण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला. पोलिस दलाने सामाजिक बांधिलकीतून विधायक व रचनात्मक काम करुन राज्यातील सर्व जिल्ह्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. मल्लेवाडी (ता. मिरज) व मणेराजुरी (ता. तासगाव) येथे २७ लाखांच्या गणेशोत्सव मंडळांच्या वर्गणीतून हे बंधारे साकारण्यात आले आहेत. मल्लेवाडीतील बंधाऱ्याचा शुक्रवारी, दि. १९ रोजी दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते लोकार्पण सोहळा होत आहे, अशी माहिती जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. मल्लेवाडीतील बंधाऱ्याचे ‘सुखकर्ता’, तर मणेराजुरीच्या बंधाऱ्याचे ‘विघ्नहर्ता’ असे नामकरण करण्यात आले आहे. गतवर्षीचा गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ करण्याचा निर्धार पोलिस यंत्रणेने केला होता. यासाठी मंडळांच्या गावोगावी २०७ बैठका घेतल्या. मी स्वत: तालुकास्तरावर दहा बैठका घेतल्या. डॉल्बीच्या दुष्परिणामांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या जलयुक्त शिवार योजनेस हातभार लावण्याचा निर्णय घेतला. मंडळांनीही त्यास चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील लहान-मोठ्या ८६३ मंडळांनी लोकवर्गणीतून जमा झालेले २७ लाख ८० हजार रुपये योजनेसाठी दिले. त्यातूनच दोन सिमेंट बंधारे बांधले आहेत. म्हैसाळ सिंचन योजनेच्या माध्यमातून मल्लेवाडीच्या बंधाऱ्यात कायम पाणी दिसेल.पोलिस प्रमुखांची धडपड यशस्वीजिल्हा पोलिसप्रमुख शिंदे यांनी उपक्रमासाठी केलेली धडपड अखेर यशस्वी झाली आहे. ‘नो डॉल्बी’मुळे पारंपरिक वाद्यांनाही सुगीचे दिवस आले. दणदणाटाशिवाय पहिल्यांदाच गणेशोत्सव पार पडला. अशाप्रकारे अनेक चांगले परिणाम या मोहिमेतून साकारले. त्यामुळे गतवर्षी गणेशोत्सवाने क्रांतीची बीजे पेरून नवा आदर्श निर्माण केला आहे. मंडळांना पुरस्कारशिंदे म्हणाले, ही संकल्पना प्रत्यक्षात पूर्णत्वास येण्यात मोलाटा वाटा असलेल्या मंडळांना ‘विघ्नहर्ता’ पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे. पोलिस ठाणे स्तरावर एक हजार, सातशे व पाचशे रुपये, तसेच स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र दिले जाणार आहे. जिल्हास्तरावरही मंडळांना पाच हजार, तीन हजार व दोन हजार अशी बक्षिसे मंडळांना दिली जाणार आहेत.
‘डॉल्बी’च्या विसर्जनातून दोन बंधाऱ्यांची प्रतिष्ठापना
By admin | Published: May 19, 2017 12:24 AM