अतुल आंबी ।इचलकरंजी : सहकार व शैक्षणिक क्षेत्रांसह वस्त्रोद्योगात प्रगतशील बनलेल्या या शहरात कामानिमित्त अन्य राज्यांतून येऊन राहिलेल्या कामगारांना धमकावून सुरुवातीला पगाराची रक्कम काढून घेणाºया टोळ्या पुढे जाऊन व्यापारी, उद्योजक यांना धमकावून हप्ता व खंडणी गोळा करू लागल्या. बाहेरहून कामासाठी आलेले व्यापारीवर्गातील अनेकजण मवाळवादी आहेत. मारामाºया, पोलीस, कोर्ट कचेरी करण्याचा त्यांचा पिंड नाही. त्याचाच गैरफायदा घेत गुन्हेगारांनी आपली दहशत निर्माण करून गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या. पोलिसांच्या छुप्या वरदहस्तामुळे त्याला गती मिळाल्याने वस्त्रनगरीची क्राईमनगरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.
शहराची पार्श्वभूमी पाहता सन १९६० नंतरच्या सहकार चळवळीतील निकोप स्पर्धेमुळे साखर कारखान्यांबरोबरच या परिसरात शैक्षणिक संस्था व विविध सूतगिरण्या उभ्या राहिल्या. त्यामुळे येथील यंत्रमाग उद्योगानेही चांगली प्रगती केली. सन २००४-०५ च्या सुमारास शहर व परिसरात आॅटोलूमचे कारखाने सुरू झाले आणि येथील वस्त्रोद्योग विकसित झाला.
आॅटोलूम कारखान्यांच्या वाढत्या संख्येबरोबर या कारखान्यांत काम करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान व कर्नाटक या राज्यांसह भिवंडी मालेगाव येथून येणाºया कामगारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. कामगार उपलब्ध झाल्याने शहराच्या परिसरातील गावांमध्येही कारखाने उभे राहिले. चंदूर, आभार फाटा, खंजिरे औद्योगिक वसाहत, कोरोची, शहापूर, पार्वती औद्योगिक वसाहत, प्राईड इंडिया टेक्स्टाईल पार्क, खोतवाडी, तारदाळ, यड्राव अशा परिसरांमध्ये वस्त्रोद्योग पसरला. त्याबरोबरच सुरू झाली गुन्हेगारी कृत्ये. स्थानिक गुन्हेगारांकडून कामासाठी म्हणून येऊन राहिलेल्या परप्रांतातील कामगारांना अडवून त्यांच्याकडून पैसे काढून घेण्याचे प्रकार सुरू झाले.
त्यामध्ये उत्तर प्रदेश व बिहार येथून आलेल्या कामगारांपैकी एखादा टार्गट असेल, तर त्यालाही आपल्या टोळीत समाविष्ट करून घेतले जायचे. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्या चांगल्याच फोफावल्या. त्यांच्याकडून गुन्हेगारी कृत्ये वाढू लागली. उत्तर भारतातील राज्यांतून सहज उपलब्ध होणारी हत्यारे या गुन्हेगारांनी मिळविली. त्याचा धाक दाखवून लुटालूट सुरू झाली. हीच लूट पुढे वाढत जाऊन जो पैसे देण्यास टाळाटाळ करतो, त्याला मारहाण, प्रसंगी खून असे प्रकार सुरू झाले. त्यातून धाडस वाढल्याने त्या परिसरात नव्याने उभारल्या जाणाºया उद्योजकांकडूनही खंडणी वसूल केली जाऊ लागली. त्यानंतर एक्स्प्रेस विद्युत पुरवठा उपलब्ध झाल्याने शहर परिसरात यंत्रमाग उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू होऊ लागले. त्यासाठी लागणारी जागा, खरेदी-विक्री व्यवहार यामध्येही गुन्हेगारी टोळ्यांनी शिरकाव केला. त्यातून बघता-बघता हे गुन्हेगार मोठे दादा बनले.औद्योगिक वसाहती हैराणगुन्हेगारी टोळक्यांनी सुरुवातीपासूनच औद्योगिक वसाहतींना लक्ष केले. तेथील कामगारांसह उद्योजकांनाही खंडणीसाठी धमक्या देणे व हप्ता वसूली करणे सुरू केले. कारखान्यातील मेंडिंगची कामे कोणाला देणे यापासून ते विविध कामात ढवळाढवळ करू लागले. त्यामुळे सर्वजण हैराण झाले होते.
(उद्याच्या अंकात : कमी श्रमात व कमी वेळेत जास्त पैसे...)