कोल्हापूर : ‘वैशाख वणवा’अर्थात मे महिना सुरू व्हायला अद्याप सव्वा महिना बाकी असला तरी ‘वैशाख’ला मागे टाकले असा उन्हाळा आतापासूनच सुरू झाला आहे. त्यामुळे झाडे-झुडपे करपायला सुरुवात झाली आहेत. शहरातील काही कमकुवत झाडे कडाक्याच्या उन्हामुळे धोकादायक होत असल्याची तक्रार ‘लोकमत हेल्पलाईन’कडे आली आहे.झाडे तोडण्याची प्रक्रिया काहीशी किचकट असल्याने नागरिकांच्या तक्रारींकडे तातडीने तसेच गांभीर्याने लक्ष दिले जात नाही, त्यामुळे एखाद्या दुर्घटनेत हकनाक कोणाचा तरी बळी जाण्यापेक्षा महापालिकेने स्वत:हून धोकादायक झाडांचा शोध घेऊन ती उतरून घ्यावीत, अशी मागणी पुढे आली आहे.शहरात अनेक ठिकाणी उंच व डेरेदार झाडे आहेत, त्यातील काही झाडांनी वयाची पंच्याहत्तरी, ऐशी वर्षे पूर्ण केली आहेत; परंतु ती उंच असल्याने किती प्रमाणात धोकादायक आहेत याचा अंदाज नागरिकांना खालून येत नाही आणि महानगरपालिका प्रशासनानेही तो कधी घेण्याचा प्रयत्न केलेला नाही.
शहरी भागात झाडांची मुळं खोलवर गेलेली नसतात. खडक, सिमेंट काँक्रीटचे रस्ते, बांधकामांमुळे मुळांचा विस्तार होत नाही. त्यामुळे वादळी वाऱ्यात उन्मळून पडण्याची शक्यता अधिक असते. मात्र, सगळीच झाडे ही धोकादायक असत नाहीत.एकीकडे ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत झाडांची दखल घेतली जात असताना दुसरीकडे जी झाडे अस्तित्वात आहेत त्या झाडांची सक्षमता तपासण्याची यंत्रणा महापालिकेकडे नाही. नागरिकांनी तक्रार केलीच तर तत्काळ दखल घेतली जाईलच असे नाही.
एखादे झाड तोडायचे झालेच तर महापालिकेतील वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. प्राधिकरणाची बैठक नियमित होत नाही. त्यामुळे तक्रार आल्यानंतरही दुर्लक्ष होण्याची शक्यता असते; परंतु त्यात कोणाचा तरी हकनाक बळी जाण्याची शक्यता असते. त्याचे अनुभवसुद्धा आपणास आलेले आहे.त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाकडून जशा धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले जाते तसेच ते धोकादायक झाडांच्या बाबतीतही सर्वेक्षण केले आणि त्यांची संख्या निश्चित करून योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
धोकादायक झाडांबाबत उदासीन का?शहरात अनेक धोकादायक झाडे आहेत. काही झाडे कोणत्याही क्षणी कोसळू शकतात आणि जीवितहानी अथवा परिसरातील घरांच्या पडझड यासारख्या दुर्घटना घडू शकतात. याबाबत महानगरपालिका पूर्ण उदासीन आहे. अशीच धोकादायक झाडे कामगार चाळीतील गणेश मंदिर समोरील रहिवाशी रामदास कराळे यांच्या घराजवळ आहेत.
स्वत: कराळे यांनी सव्वा वर्षांपूर्वी याबाबत तक्रार अर्ज केला होता. त्यांची तक्रार बेदखल केल्याचे निदर्शनास आल्यावर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते गणेश लाड यांनी दि. १६ जुलै २०१८ रोजी पुन्हा त्याच कार्यालयात अर्ज दिला; परंतु प्रशासनाने कानाडोळा केला आहे. हा नाकर्तेपणा जर सामान्यांच्या जीवावर बेतणार असेल याला जबाबदार कोण? असा प्रश्न शिवाजी पेठेतील परिसरातील जागरूक नागरिक करत आहेत.
धोकादायक झाडांची तक्रार आली तर आता माझ्या स्तरावर तत्काळ पाहणी करून ती तोडण्याची सूचना उद्यान विभागास देण्यात येते. वृक्ष प्राधिकरणाची बैठक अनियमित होत असली तरी निर्णय मात्र प्रलंबित ठेवले जात नाहीत. तक्रार आल्यावर तत्काळ संबंधितांस सूचना दिल्या जातात.नेत्रदिप सरनोबत,शहर अभियंता, महापालिका