कोल्हापूर : चालू गळीत हंगामातील उसाला साखरेऐवजी संपूर्ण ‘एफआरपी’ची रक्कम रोख स्वरूपात मिळावी, साखर सरकारनेच खरेदी करून रेशनवर द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करून तीव्र निदर्शनेही करण्यात आली.दुपारी साडेबाराच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. लक्ष्मीपुरी, व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. या ठिकाणी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली.
यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर जिल्हाध्यक्ष डॉ. उदय नारकर, सचिव सुभाष निकम, प्रा. आबासाहेब चौगुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.निवेदनातील मागण्यांमध्ये, किसान सन्मान योजनेचा लाभ, जाचक अटी रद्द करून सर्वांनाच द्यावा व त्यामध्ये महिन्याला २००० रुपयांची तरतूद करावी, देवस्थान इनामधारक शेतकऱ्यांच्या वारसांची, तसेच पीक-पाणी याची नोंद करावी. देवस्थान इनाम खालसा करून जमीन कसणाऱ्यांच्या नावे करावी, तसेच अवाजवी खंड आकारणी मागे घ्यावी.
नागनवाडी-बारवे, चिकोत्रा, धामणी, उचंगी प्रकल्पासह जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प पूर्ण करून बाधितांचे विकसनशील पुनर्वसन करावे. शेड-नेट, पॉलिहाऊस धारकांसह इतर सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जे माफ करावीत, जिल्ह्यातील रत्नागिरी-नागपूर राष्टÑीय महामार्ग बाधित शेतकऱ्यांना पाचपट नुकसानभरपाई मिळावी.आंदोलनात संभाजी यादव, आप्पासो परिट, अनिल जंगले, कृ ष्णात चरापले, बाळासाहेब कामते, विनायक डंके, सुभाष शिंदे, राजेंद्र आळवेकर, पांडुरंग कोले, नारायण गायकवाड, बसगोंडा पाटील, आदींचा समावेश होता.