कोल्हापूर : जन्मजात श्रवण, वाचा दोष दूर करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी संवाद आणि आस्था संस्थांनी पुढाकार घेतला आहे. हे दोष दूर करण्यासाठी कमी वयात कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करावी लागते. सध्या अशी शस्त्रक्रिया तातडीेन पाच मुलांवर करावी लागणार आहे. एका मुलाच्या शस्त्रक्रियेसाठी आठ लाख रुपये खर्च येणार आहे. सरकारच्या विविध योजनांमधून ऐंशी टक्के रक्कम संस्थांनी उभा केली आहे. उर्वरित रकमेसाठी समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि कंपन्यांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन मंगळवारी संवाद आणि आस्था संस्थेच्या समन्वयक शिल्पा हुजूरबाजार, यश हुजूरबाजार, स्वाती गोखले यांनी पत्रकार परिषदेतून केले.
हुजूरबाजार म्हणाल्या, वाचा, श्रवण दोष असणाऱ्यांना संवाद क्लिनिकमधून सेवा, सुविधा उपलब्ध करण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. असा दोष असणारी मुले किंवा मुलींना कराव्या लागणारी शस्त्रक्रिया पुणे, मुंबई येथे होते; पण ही शस्त्रक्रिया कोल्हापुरातील नामांकित रुग्णालयात होण्यासाठी संवाद, आस्था संस्था प्रयत्न करीत आहे. सध्या दोष निदान झालेले तीन मुलगे आणि दोन मुलींवर अशी शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने सामान्य, मध्यमवर्गीय कुटुंबास परवडणारे नाही. म्हणून दोन संस्थांच्या माध्यमातून त्यांना मदत केली जात आहे. पाच मुलांसाठी एकूण दहा लाखांची गरज आहे. उर्वरित पैसे सरकारच्या विविध योजनांमधून उभे करण्यात येणार आहे. प्रत्येक मुलास अडीच लाख रुपये दानशूरांकडून मिळाल्यास शस्त्रक्रिया होईल. मदत करू इच्छिणाऱ्यांनी आस्था, संवाद वाचा श्रवणदोष उपचार केंद्र, भेंडे गल्ली (फोन २३१-२५४१०७१, ९१५६०४९०३४ ) येथे संपर्क साधावा.