गडहिंग्लज : सध्या तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील महागाव आणि करंबळीमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. सध्या आढळून येणारे रुग्ण हे बाहेरून आलेले आहेत. त्यामुळे सर्व गावांनी बाहेरून येणाऱ्या आपल्या गावबांधवांना संस्थात्मक अलगीकरणातच ठेवावे, असा निर्णय गडहिंग्लज पंचायत समितीच्या मासिक सभेत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी सभापती रूपाली कांबळे होत्या.
बाहेरून आलेल्या नागरिकांना गृहअलगीकरणात ठेवल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे कठीण होत आहे. त्यासाठी संस्थात्मक अलकरणासाठी व्यवस्था करा. महागावमधील अतिक्रमण करून सुरू असलेल्या बांधकामांची चौकशी करण्याची मागणी विजयराव पाटील यांनी केली. रुग्णसंख्या आटोक्यात आणून ‘ब्रेक द चेन’साठी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व पदाधिकारी व ग्रामदक्षता समित्यांनी सज्ज राहावे. सध्या यात्रांचा काळ असून यात्रा रद्द केल्या जात आहेत. परंतु, रद्द हे केवळ वरवरचे असून नेहमीप्रमाणे यात्रा पार पाडल्या जात आहेत.
बाहेरून येणाऱ्यांवर नियंत्रण नाही तसेच दुसऱ्या लाटेला लोकांनी गांभीर्याने घेतलेले दिसत नाही. त्यामुळे साखळी तोडणे अशक्य होणार आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वीच अलगीकरणासाठी शाळा उपलब्ध करून त्याठिकाणी व्यवस्था करण्याच्या सूचनाही गटविकास अधिकारी शरद मगर यांनी दिल्या.
तालुक्यातील फ्रंटलाईन वर्कर, ग्रा. पं. पदाधिकारी, सदस्यांना लोकप्रतिनिधींनाही लस देण्यात यावी, अशी मागणी विद्याधर गुरबे यांनी केली.
शेतकऱ्यांना कोणतीच कल्पना न देता व आढावा बैठक न घेता उपसा बंदी केली आहे. त्यामुळे हा शेतकऱ्यांवर अन्याय असून यापुढे बैठकीशिवाय उपसा बंदीचा निर्णय घेऊ नये, अशी सूचना श्रीया कोणकेरी यांनी केली. बेकनाळमधील थांबविण्यात आलेले काम पुन्हा सुरू करण्यासह बड्याचीवाडी ग्रामपंचायतीकडील हद्दवाढ क्षेत्रातील नगरपालिकेने करवसुली केली आहे. त्यामुळे ३२ लाखांचे थकीत बिल ग्रामपंचायतीकडे दिसते याची चौकशी करण्याची मागणी विठ्ठल पाटील यांनी केली.
चर्चेत जयश्री तेली, बनश्री चौगुले यांनीही सहभाग घेतला.
यावेळी उपसभापती इराप्पा हसुरी, सहाय्यक नगरविकास अधिकारी आनंद गजगेश्वर आदींसह खातेप्रमुख उपस्थित होते.