कोल्हापूर : सहकाराचा संस्कार जपणाऱ्या लोकमान्य सोसायटीसारख्या संस्थांनी राज्याच्या विकासात मोलाची भर घातली आहे. त्यामुळे इतर संस्थांनीही त्यातून आदर्श घेऊन ‘लोकमान्य’प्रमाणे पथदर्शी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लोकमान्य मल्टिपर्पज को-आॅप. सोसायटीच्या सेनापती बापट रोड, पुणे येथील स्वमालकीच्या चौमजली विभागीय कार्यालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर प्रशांत जगताप, उपमहापौर मुकारी अण्णा अलगुडे, सोसायटीचे संस्थापक-अध्यक्ष व ‘तरुण भारत’चे सल्लागार-संपादक किरण ठाकूर, बेळगावच्या नवनिर्वाचित महापौर सरिता पाटील, उपमहापौर संजय शिंदे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर पाटकर, उपाध्यक्षा आरती कुलकर्णी, संचालक प्रसाद ठाकूर, पंढरी परब, सुबोध गावडे, अजित गरगट्टी, अनिल चौधरी, शेवंतीभाई शहा, विठ्ठल प्रभू, क्षेत्रीय व्यवस्थापक सुशील जाधव, समन्वयक विकास केशकामत, विनायक जाधव उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘लोकमान्य’ची आजवरची वाटचाल विलक्षण अशीच आहे. २०३ शाखा व २३०० कोटींच्या ठेवी असलेल्या या सोसायटीने दिल्लीपर्यंत मजल मारली आहे. कोणत्याही संस्थेच्या संचालकांचे परिश्रम व सचोटी महत्त्वाची असते. त्याच बळावर सहकार तसेच क्षेत्रातील संस्कार जपत अग्रगण्य संस्था म्हणून ‘लोकमान्य’ने लौकिक मिळविला आहे. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, सध्या सहकारी बॅँकांची स्थिती फारशी चांगली नाही; पण लोकमान्य टिळकांच्या नावाने सुरू असलेली ही संस्था म्हणजे प्रगतीचे मूर्तिमंत उदाहरण आहे. सोसायटीचे संस्थापक किरण ठाकूर म्हणाले, तरुणांना नोकरी व उद्योग मिळवून देण्यासाठी व सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी संस्थेची स्थापना झाली. पुणेकरांचा विश्वास संपादन करू शकल्याने देशभरात पोहोचू शकलो. संस्थेने विविध क्षेत्रांत पुढाकार घेऊन ‘मेक इन इंडिया’साठी हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वीस वर्षांत बॅँकिंग, पर्यटन, विमा, रिअल इस्टेट, आरोग्य व शिक्षणासारख्या अनेक कार्यक्षेत्रांत सोसायटीने भरारी घेतली. आगामी काळात जलसेवा व विमानसेवेतही उतरणार असल्याचे ठाकूर म्हणाले. ‘लोकमान्य’तर्फे दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत‘लोकमान्य’तर्फे दुष्काळग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी ‘लोकमान्य’ ही मदत मागणारी नव्हे, तर देणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.
संस्थांनी ‘लोकमान्य’चा आदर्श घ्यावा
By admin | Published: March 06, 2016 11:39 PM