इचलकरंजी : पालिकेने शहरातील ५३ हजार मालमत्ताधारकांना १७ ते २० टक्के घरफाळा वाढीच्या नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील वस्त्रोद्योगात गेली दोन वर्षे मंदीचे वातावरण आणि सध्याच्या नोटाबंदीमुळे हैराण झालेल्या मालमत्ताधारकांना पालिकेने वाढीव कराचा झटका दिल्याने त्याविरोधात हरकती, सूचना दाखल करण्यासाठी नगरपालिकेत गर्दी वाढत आहे. दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे वस्त्रोद्योग मंदीतून मार्गक्रमण करीत असल्याने त्याचा परिणाम अन्य उद्योगधंद्यावरही दिसून येत आहे. तसेच नोटाबंदीच्या निर्णयाचाही फटका उद्योगधंद्यांना बसल्याने आर्थिक व्यवहार थंडावला आहे. अशा संक्रमणावस्थेत नागरिक असताना इचलकरंजी नगरपालिकेने मालमत्ताधारकांना चतुर्थ वार्षिक कर आकारणी लागू केली आहे. २०१२ नंतर यावर्षी नगरपालिकेने लागू केलेल्या या कर आकारणीत शहरातील सर्वसामान्य नागरी भागास १७ टक्क्यांपासून औद्योगिक भागास २० टक्क्यांपर्यंत करवाढ केली आहे. या वाढीव कराच्या नोटिसा गेल्या १५ दिवसांपासून वितरित करण्याचे कामही सुरू आहे. तसेच विनापरवाना बांधकामासाठी दुप्पट कराची शास्ती लागू करून त्याही नोटिसा लागू केल्या आहेत. करवाढीबाबत हरकती, सूचना मांडण्यास २२ डिसेंबरपर्यंत पालिका प्रशासनाने मुदत दिली आहे. त्यामुळे या करवाढीविरोधात मालमत्ताधारक मोठ्या संख्येने हरकती, सूचना मांडत असल्याने कर विभागासमोर लांबच लांब रांगा लागत आहेत. आजअखेर सुमारे चार हजार मिळकतधारकांनी करवाढीविरोधात हरकती दाखल केल्या असून, विविध पक्ष, संघटनांही मिळकतधारकांच्या हरकती, सूचना दाखल करण्यासाठी जागृती करीत आहेत. २८ डिसेंबरपर्यंत या हरकती, सूचनांवर सुनावणी होणार आहे. त्यानंतर सभागृहात करवाढीबाबत निर्णय होणार आहे. त्यामुळे सभागृहाच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे. (वार्ताहर)
वाढीव कराच्या विरोधात सूचना, हरकतींसाठी नागरिकांची गर्दी
By admin | Published: December 21, 2016 10:35 PM